केडीएमसीच्या कपोते वाहन तळाचा कंत्राटदार स्वत:च खात हाेता मलिदा; १ कोटी २० लाख रुपये थकवले
By मुरलीधर भवार | Updated: December 12, 2024 20:52 IST2024-12-12T20:52:12+5:302024-12-12T20:52:40+5:30
केडीएमसीने वाहन तळ घेतला ताब्यात...

केडीएमसीच्या कपोते वाहन तळाचा कंत्राटदार स्वत:च खात हाेता मलिदा; १ कोटी २० लाख रुपये थकवले
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेने स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत दिलीप कपोते वाहन तळ उभारले आहे. हे वाहनत तळ महापालिकेने खाजगी कंत्राटदाराला चालविण्यास दिले होते. कंत्राटदाराने महापालिकेस भरावयाची रक्कम थकविली होती. कंत्राटदाराने १ कोटी २० लाख रुपये थकविल्याने त्याच्याकडून वाहन तळाचा ताबा महापालिका प्रशासनाने काढून घेतला आहे. आत्ता हे वाहन तळ महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी चालविणार असल्याची माहिती उपायुक्त रमेश मिसाळ यांनी दिली आहे.
स्टेशन परिसरातील कपोते वाहन तळ स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बांधण्यात आले आहे. हे वाहन तळ मल्टी लेव्हल आहे. वाहन तळाची इमारत सहा मजली आहे. फेब्रुवारी महिन्यात एका खाजगी कंत्राटदार कंपनीला हे वाहनत चालविण्यास देण्यात आले होते. महापालिकेने निविदा काढून हे वाहनतळ चालविण्यास दिले होते. वाहन तळ चालकाकडून महापालिकेस १ कोटी २० लाख रुपये येणे बाकी आहे. ही थकबाकी त्यांनी ताततीने महापालिकेच्या तिजाेरीत जमा करावी अशी नोटिस महापालिका प्रशासनाकडून संबंधित कंत्राटदाराला बजावण्यात आली होती. त्याला कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही. अखेरीस आज त्याच्याकडून वाहन तळाचा ताबा महापालिकेने काढून घेतला. त्याला वाहन तळ खाली करण्यास सांगितले आहे. वाहन तळासाठी नव्या कंत्राटदाराची प्रक्रिया राबविली जाणार आहे. तोपर्यंत हे वाहन तळ महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत चालविले जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन पार्किंगेचे पासेस अथवा शुल्क कंत्राटदाराकडे न भरता महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याकडे जमा करावे असे आवाहन उपायुक्त मिसाळ यांनी केले आहे.