मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती
By अनिकेत घमंडी | Updated: January 2, 2024 17:41 IST2024-01-02T17:40:35+5:302024-01-02T17:41:34+5:30
दक्ष नागरिकांनी भीती व्यक्त केली वेगाने जाणारे वाहने, खेळणाऱ्या मुलांचा होऊ शकतो अपघात.

मुख्य दरवाजा उघडा असल्याने मिलापनगर तलावात दुर्घटना होण्याची शक्यता; नागरिकांनी व्यक्त केली भीती
अनिकेत घमंडी,डोंबिवली : मिलापनगर, एमआयडीसी मधील तलावाचा मुख्य दरवाजा दोन आठवड्यापासून उघडा असल्याने तेथे कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती दक्ष नागरिक राजू नलावडे यांनी व्यक्त केली. त्या तलावाच्या मुख्य दरवाजाची दोन पैकी एक बाजू उघडी असून ती बाजूला काढून ठेवण्यात आल्याचे ते म्हणाले. त्या मुख्य दरवाजाजवळ तलावाची सुरवात होऊन त्यातील पाणी दरवाजा पर्यंत असते. त्या दरवाजाला लागूनच काँक्रिट रस्ता जात आहे. मिलापनगर तलाव रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्याने त्यावरून आता वाहने वेगाने जात आहेत. त्यांचा वेग कमी करण्यासाठी रस्त्यावर कमीत कमी दोन ठिकाणी स्पीड ब्रेकर लावणे आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली.
जर एखादे वाहन, दुचाकीवाला वेगाने येऊन त्याचे नियंत्रण राहिले नाही तर तो सरळ तलावात जाण्याची शक्यता असल्याने तलावाचा मुख्य दरवाजा नेहमी प्रमाणे बंद करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. शिवाय त्या उघड्या मुख्य दरवाजा जवळ काही अल्पवयीन मुले व नागरिक मासे पकडण्यासाठी/माशांना खाद्य टाकण्यासाठी, लहान मुले खेळण्यासाठी तलावा जवळच वावरतात, ते देखील धोक्याचे आहे असेही नलावडे म्हणाले. तलावाच्या दुर्दशेबद्दल तक्रारी केल्यानंतर तसेच प्रसार माध्यमात बातम्या आल्यानंतर या तलावाची नावापुरती दिखाऊ साफसफाई काही दिवसापूर्वी करण्यात आली होती. तलावाला लागून असलेले गटार बनवायचे काम अद्याप पूर्ण झाले नाही आहे. त्यामुळे गटाराचे पाणी तलावात जाण्याची शक्यता असते. कमीतकमी या तलावाचा मुख्य दरवाजा दुरुस्ती करून बंद करून घ्यावा जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी केडीएमसी प्रशासनाला विनंती करण्यात आली असून त्यांनी यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू अद्याप काहीच हालचाल केडीएमसी प्रशासनाकडून होताना दिसत नाही. येथे काही दुर्घटना घडल्यानंतर केडीएमसीला जाग येणार का ? असा सवाल नलावडे यांनी केला.