मुंबई : पोलिस ठाण्यामध्ये केलेल्या गोळीबारप्रकरणी कल्याणचे भाजपचे माजी आ. गणपत गायकवाड यांच्यावर नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास योग्यरीत्या करण्यात आला नाही, असा दावा करत शिंदे सेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी तपास सीबीआयकडे वर्ग करावा किंवा एसआयटी स्थापन करण्यात यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
न्या. रवींद्र घुगे व न्या. गौतम आंखड यांच्या खंडपीठाने उल्हासनगरच्या पोलिसांना आणि राज्य सरकारला नोटीस बजावत पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी ठेवली. घटनेच्या वेळी आमदार असलेले गायकवाड यांनी राजकीय वैमनस्यातून महेश गायकवाड यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत झाला, असा दावा केला आहे.