कल्याण ग्रामीणमध्ये गुरं चरण्याच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण; केडीएमसी कारवाई करीत नसल्याने आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचे पूजन
By मुरलीधर भवार | Updated: April 7, 2026 15:14 IST2026-04-07T15:11:37+5:302026-04-07T15:14:52+5:30
पूजन करुन घाऊ घातले शेण, सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रभाग कार्यालयासमाेर आंदोलन

कल्याण ग्रामीणमध्ये गुरं चरण्याच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण; केडीएमसी कारवाई करीत नसल्याने आयुक्तांच्या प्रतिकात्मक फोटोचे पूजन
कल्याण : कल्याण ग्रामीणमधील द्वारली पाडा परिसरात गुरं चरण्यासाठी जागा आरक्षित आहे. या जागेवर भूमाफियांना अतिक्रमण केले आहे. त्याच्या विरोधात कल्याणमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केडीएमसीकडे तक्रार करुन संबंधित जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे. ती जागा गुरं चरण्यासाठी माेकळी करण्यात यावी. या मागणीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यापूर्वी या विरोधात एक आंदोलनही करण्यात आले होते. तरी देखील प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर समाजिक कार्यकर्ते सौरभ पांडे, विनोद तिवारी आणि सौरभ सिंग यांनी पुन्हा केडीएमसीच्या ई प्रभाग कार्यालयासमोर अनोखे आंदोलन केले. केडीएमसी आयुक्ताच्या प्रतिकात्मक फोटोचे पूजन करुन शेण खाऊ घातले. या प्रकरणी केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी सांगितले की, या संदर्भातील कारवाई सुरु केली आहे.
द्वारलीपाडा परिसरात गुरं चरण्यासाठी जवळपास तीन एकर जागा आरक्षित आहे. त्या जागेवर भूमाफियांनी अतिक्रमण करून चाळ उभी केली आहे. त्या ठिकाणी जवळपास ९० घरे बांधली आहेत. गुरं चरण्याच्या आरक्षित जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आल्याची माहिती महापालिकेस नाही. भूमाफिया आणि केडीएमसी अधिकारी यांचे साटेलोटे असल्याने आरक्षित जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सौरव सिंह, सौरभ पांडे आणि विनोद तिवारी यांनी या संदर्भात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. ४ जानेवारीपासून ते या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत, मात्र अद्याप महापालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. याच आंदोलकांनी काही दिवसापूर्वी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात म्हैस आणली होती. कारण म्हशीला चरण्यासाठी असलेली जागा अतिक्रमित झाली आहे. मंगळवारी याच गुरं चरण्याच्या जागेप्रकरणी आयुक्तांच्या प्रतिकात्मक प्रतिमेस शेण खाऊ घालून आंदोलन करुन पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष याकडे वेधण्याचा प्रयत्न केला आहे. सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना नोटीस देण्यात आली असून पुढील कारवाई केली जाईल.