.... म्हणून केडीएमसीच्या अधिकाऱ्याने ठेवली कार्यालये बंद; उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 13:57 IST2021-07-15T13:56:38+5:302021-07-15T13:57:26+5:30
डोंबिवली विभागीय कार्यालयात शहारातील नागरिक विविध कामांसाठी रोज येत असतात.

.... म्हणून केडीएमसीच्या अधिकाऱ्याने ठेवली कार्यालये बंद; उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे
- मयुरी चव्हाण
डोंबिवली- कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि येथील अधिकारी, कर्मचारी वर्ग कायम वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात. यापूर्वी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी कल्याण येथील पालिकेच्या कार्यालयात देखील अचानक पाहणी दौरा करत कर्मचा-यांना दणका दिला होता. आता पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील प्रभाग क्षेत्र अधिकारी दहा वाजून गेले तरी कर्मचारी आले नसल्याने विविध कार्यालयाच्या चाव्या आपल्या सोबत घेऊन एका पालिकेच्या कार्यक्रमाला निघून गेले. यामुळे उशिरा आलेले कर्मचारी कार्यालयाबाहेर उभे होते. या सर्व गोंधळाचा फटका मात्र या ठिकाणी विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना बसला आहे.
डोंबिवली विभागीय कार्यालयात शहारातील नागरिक विविध कामांसाठी रोज येत असतात. मात्र अनेकदा नागरिकांना एका कामासाठी वारंवार कार्यालयाच्या पाय-या झिजवाव्या लागत असल्याचही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे कर्मचा-यांबद्दलही नागरिकांमधून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र आता पालिकेच्या अधिका-यानेच कर्मचा-यांची पोलखोल केली आहे. गुरुवारी डोंबिवली विभागीय कार्यालयात दहा वाजून गेले तरी अनेक कर्मचा-यांचा पत्ता नव्हता. ग प्रभाग क्षेत्र अधिकारी संदीप रोकडे यांच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे त्यांनी काही आस्थापनांचे टाळे तसेच ठेवत चाव्या आपल्या सोबत घेतल्या आणि वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला निघून गेले.
टाळे पाहून कर्मचारी सुमारे दीड तास बाहेरच उभे राहिले. एरवी निवांत असलेल्या कर्मचा-यांची चाविचा ताबा घेण्यासाठी आणि मस्टरवर सही करण्यासाठी एकच धावपळ उडाली. अखेर 12 वाजण्याच्या सुमारास टाळे उघडण्यात आले. मात्र या सर्व गोंधळाचा फटका नागरीकांना बसलेला पाहायला मिळाला. मात्र याचा काही परिणाम कर्मचा-यांवर होणार का? की पुन्हा " येरे माझ्या मागल्या" हा सिलसिला सुरू राहणार ते पाहावे लागेल. कर्मचारी उशिरा आल्याची बाब रोकडे यांनीही " लोकमत "शी बोलताना मान्य केली आहे.
दहा वाजुन गेले तरी बहुसंख्य कर्मचारी आले नव्हते. आस्थापनांना टाळे लागले होते. कर्मचारी वेळेत आले नसल्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला जाताना मी चाव्या सोबतच घेऊन गेलो. कर्मचारी उशीरा आल्याचे मान्य आहे.
- संदीप रोकडे, ग प्रभाग क्षेत्र अधिकारी, केडीएमसी.