रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हाताेडा
By मुरलीधर भवार | Updated: February 16, 2023 16:41 IST2023-02-16T16:40:49+5:302023-02-16T16:41:02+5:30
कल्याण-बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरण आणि कल्याण डाेंबिवली महापलिकेची फसवणूक केल्या प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालवून पाडकामाची कारवाई केली आहे.

रेरा प्रकरणातील बेकायदा इमारतीवर केडीएमसीचा हाताेडा
कल्याण-कल्याण-बनावट कागदपत्रांच्या आधारे रेरा प्राधिकरण आणि कल्याण डाेंबिवली महापलिकेची फसवणूक केल्या प्रकरणातील बेकायदा इमारतीवर महापालिकेच्या कारवाई पथकाने हाताेडा चालवून पाडकामाची कारवाई केली आहे.
महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांनी ही कारवाई केली आहे. महापालिका हद्दीतील काही बिल्डरांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांना हाताशी धरुन महापालिकेकडून बांधकाम परवानगी मिळविल्याचे भासवित रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम नाेंदणीचे प्रमाणपत्र मिळविले. रेरा प्राधिकरणास महापालिकेची फसवणूक केली. या प्रकरणातील डाेंबिवली पश्चिमेतील कुंभारखानपाडा येथे शिवसावली काॅम्पलेक्स या इमारतीचे मनाेज भाेईर आणि प्रफुल्ल गाेरे यांनी बेकायदा बांधकाम केले हाेते. तळ अधिक सहा मजली बेकायदा इमारतीचे स्लॅब ताेडण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्याठिकाणी २० बाय ४० आकाराचे २ फूटींगचे बेकायदा बांधकाम करण्यात आले हाेते.
त्याचबराेबर कुंभारखान पाडा येथील बांधकामधारक सिद्धेश किर याने तळ अधिक सहा मजली बेकायदा इमारत रेरा आणि महापालिकेची फसवणूक करुन उभारली हाेती. या बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पाेलिस बंदाेबस्तात ब्रेकर आणि जेसीबीच्या सहाय्याने ३० कामगार लावून करण्यात आली.
रेरा आणि महापालिका फसवणूक प्रकरणात ६५ बेकायदा बांधकाम प्रकरणात बिल्डरांच्या विराेधात डाेंबिवलीतील दाेन पाेलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणाची चाैकशी एसआयटी आणि ईडीकडून सुरु आहे. एसआयटीने ५६ जणांची बॅक खाती गाेठविली आहेत. तसेच दहा जणांना अटक केली आहे. दहा जणांची रवानगी न्यायालयीन काेठडीत करण्यात आली आहे. एसआयटी तसेच ईडीकडून तपास सुरु असला तरी महापालिका आयुक्तांकडे ईडीकडून मागविण्यात आलेला अहवाल तयार आहे. ताे अहवाल आयुक्तांकडून सादर केला जाणार आहे. या प्रकरणात आयुक्तांसह तक्रारदार संदीप पाटील यांच्याकडूनही ईडीने माहिती घेतली आहे. तसेच काही अधिकारी वर्गाचीही चाैकशी करण्यात आलेली आहे. या प्रकरणातील मनी लाॅण्ड्रींग करणारे ईडीच्या रडावर आहेत.