कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग पूर्ण करून नगरपर्यंत नेणार : देवेंद्र फडणवीस
By अनिकेत घमंडी | Updated: May 13, 2024 20:13 IST2024-05-13T20:11:55+5:302024-05-13T20:13:06+5:30
कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी मुरबाडमध्ये महायुतीचा कार्यकर्ता मेळावा.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग पूर्ण करून नगरपर्यंत नेणार : देवेंद्र फडणवीस
डोंबिवली : देशात मोदी सरकारच्या स्थापनेनंतरच कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद केली असून, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग आता कोणीही थांबवू शकत नाही. पुढील टप्प्यात नगरपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी आमदार किसन कथोरेंसह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जीवाचे रान करतील, हा फडणवीस यांचा शब्द आहे. मुरबाड मतदारसंघात विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
फडणवीस यांच्या उपस्थितीत मुरबाड येथे सोमवारी महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार जगन्नाथ पाटील, शिवसेनेचे उपनेते प्रकाश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुभाष पवार, अरविंद मोरे, मनसेचे लोकसभा प्रमुख शैलेश बिडवी, कुणबी सेनेचे विश्वनाथ पाटील, आरपीआयचे मेहबुब पैठणकर, संजय गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उल्हास बांगर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मंजूर झाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्ष सर्व रेल्वे प्रकल्पांना राज्य सरकारने ५० टक्के निधी दिला नाही. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेसह सर्व रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली होती. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर तिसऱ्याच दिवशी मुरबाड रेल्वे प्रकल्पाला निधीची हमी देण्याचे पत्र घेऊन खासदार कपिल पाटील दिल्लीला गेले होते. या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातही तरतूद झाली असून, आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यास कोणीही थांबवू शकत नाही. मुरबाडहून नगरपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
बनावट मेसेजवर विश्वास ठेवू नका:
यंदाची निवडणूक ही देशाची असून, जातीपातीच्या नावावर नको, तर विकासाच्या नावाने कार्य करू या, असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. तसेच आपल्या नावाने दिशाभूल करणारे व्हॉट्स अॅप मेसेज दिले जात आहेत. या बनावट मेसेजवर विश्वास ठेवू नये. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये, असे नमूद करीत महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यकर्ते काम करतील. कोणीही कितीही वल्गना केल्या तरी, मुरबाडमधून कपिल पाटील यांना गेल्या निवडणुकीपेक्षा सर्वाधिक मताधिक्य दिले जाईल, अशी ग्वाही आमदार कथोरे यांनी दिली.
प्रत्येक कार्यकर्त्याने बूथचा अभ्यास करून जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
या वेळी हिंदुराव, पवार यांचीही भाषणे झाली.