कल्याण डोंबिवली शहराने पटकावले सात राष्ट्रीय पुरस्कार
By सचिन सागरे | Updated: January 14, 2024 19:18 IST2024-01-14T19:17:45+5:302024-01-14T19:18:20+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवलीच्या चमूने पहिल्या टप्प्यात ४५ दिवसात सायकलिंग श्रेणीमध्ये ८२५४ किमी, चालणे श्रेणीमध्ये २०३६ किमी व रनिंगमध्ये ...

कल्याण डोंबिवली शहराने पटकावले सात राष्ट्रीय पुरस्कार
कल्याण: कल्याण डोंबिवलीच्या चमूने पहिल्या टप्प्यात ४५ दिवसात सायकलिंग श्रेणीमध्ये ८२५४ किमी, चालणे श्रेणीमध्ये २०३६ किमी व रनिंगमध्ये १४८३ किमी पार करताना या तीन वर्गात सुवर्ण परितोषिक पटकावले. तसेच, व्यक्तिगत श्रेणीमध्ये ४५ दिवसात ४७५० किमी सायकलिंग करत अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी देशात तिसरा क्रमांक, सहाय्यक अभियंता अजित देसाई यांनी धावणे श्रेणीत ११४३ किमी रनिंग करून प्रथम क्रमांक व गार्डन पर्यवेक्षक अनिल तामोरे यांनी चालणे या श्रेणीत ९८७ किमी चालत तिसरा क्रमांक पटकवला आहे.
भारत सरकार गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयमार्फत सन २०२३ या वर्षात शहरातील महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेसाठी ‘फ्रीडम टू वर्क, रन अँड सायकल’ हे अभियान आयोजित केले होते. शहरातील नागरिकांमध्ये आरोग्यासाठी आवश्यक चालणे, धावणे व सायकलिंग करणे याबाबत जनजागृती व त्यादृष्टीने आवश्यक पायाभूत सुविधा शहरात निर्माण करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. १ फेब्रुवारी ते १७ मार्च आणि १५ जून ते ३० जुलै २०२३ या दोन टप्प्यात प्रत्येकी ४५ दिवस कालावधीसाठी अभियान होते.
पिंपरी चिंचवड येथे ग. दि. माडगुळकर सभागृहात स्ट्रीट अँड पब्लिक स्पेसेस या विषयावर झालेल्या कार्यशाळेत कल्याण डोंबिवली शहराला सात राष्ट्रीय पुरस्कार कुणाल कुमार सहसचिव व डायरेक्टर स्मार्ट सिटी मिशन यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वीकारण्यासाठी केडीएमसीच्या वतीने कार्यकारी अभियंता (विद्युत) प्रशांत भागवत, उपअभियंता (स्मार्ट सिटी) संदीप तांबे, सहाय्यक अभियंता अजित देसाई व गार्डन पर्यवेक्षक अनिल तामोरे उपस्थित होते.