थकीत मालमत्ता प्रकरणी दावा दाखल, केडीएमसीकडून २७ हजार ९७३ जणांना नोटिसा
By मुरलीधर भवार | Updated: August 31, 2023 18:44 IST2023-08-31T18:44:45+5:302023-08-31T18:44:59+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी थकविणारे अनेक थकबाकीदार आहे.

थकीत मालमत्ता प्रकरणी दावा दाखल, केडीएमसीकडून २७ हजार ९७३ जणांना नोटिसा
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मालमत्ता कराची थकबाकी थकविणारे अनेक थकबाकीदार आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लाेक अदालत आयोजित केली आहे. या लाेक अदालतीमध्ये एकूण २७ हजार ९७३ दावा दाखल पूर्व प्रकरणे ( प्री लिटिगेशन मॅटर्स ) घेण्याकरीता न्यायालयाच्या सही शिक्क्यासह नोटिसा तयार करण्यात आल्या असून त्या संबंधितांना महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून पाठविण्याचे काम सुरु असल्याची माहिती मालमत्ता कर वसूली विभागाचे उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचे सूचनेनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांचे आदेशानुसार तिसरी राष्ट्रीय लोक अदालत ९ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे. या लोक अदालतीपूर्वी दावा दाखल करणाऱ््यांना नोटिसा पाठविल्या जाणार आहेत.
थकीत कर वसूलीच्यासाठी महापालिकेने १५ जून रोजी अभय योजना लागू केली. थकीत रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम एकरकमी भरल्यास ७५ टक्के दंडाची आणि व्याजाची रक्कम माफ करण्यात येत आहे. सुरुवातीला ही अभय योजना ३१ जुलै पर्यंत होती. त्याची मुदतवाढ करुन ती १८ आ’गस्टपर्यंत करण्यात आली.
१८ आगस्ट पर्यंत महापालिकेच्या तिजोरीत अभय योजनेच्या माध्यमातून १७५ कोटीची माया जमा झाली होती. पुन्हा या योजनेला मुदतवाढ दिली गेली. ३१ आ’गस्टपर्यंत मुदत होती. आजच्या तारखेत अभय योजनेतून एकूण २०४ कोटी सात लाख रुपये झाले आहेत. १८ ते ३१ आ’गस्ट दरम्यान २९ कोटी ७ लाख रुपये थकबाकी दारांनी भरले आहे. आत्तापर्यंत ४३ हजार ९९३ थकबाकीदारांनी या अभय योजनेचा लाभ घेतला आहे.
दावा दाखल पूर्व प्रकरणातील २७ हजार ९७३ जणांना महापालिकेच्या अभय योजनेचा लाभ घेता यावा यासाठी पुन्हा १५ सप्टेंबरपर्यंत अभय योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. कारण ९ सप्टेंबर रोजी लोक अदालत आहे. ही लोक अदालत यशस्वी होण्यासाठी ही मुदतवाढ दिली गेली असल्याचे उपायुक्त कुळकर्णी यांनी सांगितले.