ई-कचऱ्याच्या नावाखाली उल्हासनगर महापालिकेचे ११९ संगणक भंगारात
By सदानंद नाईक | Updated: October 10, 2023 15:25 IST2023-10-10T15:24:30+5:302023-10-10T15:25:06+5:30
नागरी सुविधा केंद्राची आयुक्ताकडून झाडाझडती

ई-कचऱ्याच्या नावाखाली उल्हासनगर महापालिकेचे ११९ संगणक भंगारात
सदानंद नाईक
उल्हासनगर : ई-कचऱ्याच्या नावाखाली १० वर्ष जुनी ११९ संगणक भंगारात काढण्यात येऊन त्यापासून महापालिकेला १ लाख ३५ हजाराचे उत्पन्न मिळाल्याची माहिती नागरी सेवा केंद्राच्या प्रमुख श्रद्धा सपकाळे यांनी दिली. मात्र सोमवारी संगणक टेम्पोत भरून नेल्याच्या अफवेने, महापालिकेत एकच खळबळ उडून आयुक्त अजीज शेख यांना केंद्राची झाडाझडती घ्यावी लागली आहे.
उल्हासनगर महापालिकेने स्वच्छता मोहिमे अंतर्गत रविवारी सुट्टीच्या दिवशी मुख्यालयातील विविध विभागाची स्वच्छता करून, उपयोगी नसलेले साहित्य भंगारात काढले. तर उपयोगी साहित्य नीटनेटके ठेवून त्यांची नोंदणी करून ठेवली. त्याच प्रमाणे नागरी सुविधा केंद्रात ई-कचरा संकल्पना राबवून १० वर्ष जुने एकून ११९ संगणक व प्रिंटर भंगारात काढले. त्यासाठी विभागाच्या प्रमुख श्रद्धा सपकाळे यांनी आयुक्तांच्या परवानगीने जुन्या संगणकाच्या निविदा काढल्या. त्यापासून महापालिकेला १ लाख ३५ हजाराचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सपकाळे यांनी दिली. सोमवारी भंगारात काढलेले संगणक टेम्पोत नेताना, नवीन संगणक व प्रिंटर नेल्याच्या अफवेने महापालिकेत एकच खळबळ उडाली.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे संगणक व प्रिंटर चोरीला गेल्याची तक्रार आल्यावर, त्यांनी नागरी सुविधा केंद्रात धाव घेऊन, विभागाची झाडाझडती घेतली. त्यावेळी विभागाने ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी रितसर निविदा कडून जुने संगणक भंगारात काढल्याचे उघड झाले. संगणक व प्रिंटर चोरीला गेल्याच्या अफवेत तथ्य नसल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांनी दिली. भंगारात काढलेल्या संगणका सोबत एकही दिवस उपयोग न केलेले काही सील बंद प्रिंटर गेल्याचे बोलले जाते. त्याबाबतची चौकशी करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहे.
चौकशी झाल्यास, संगणक घोटाळा होणार उघड
महापालिकेतील विविध विभागात दरवर्षी किती संगणक, प्रिंटर व त्यासंबंधित साहित्य खरेदी केले. त्यांची आजची स्थिती व ई-कचरा अंतर्गत भंगारात काढलेल्या संगणक व प्रिंटरची संख्येची मागणी सर्व पक्षीय पदाधिकारी व नेत्यांनी आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली. चौकाशी केल्यास संगणक खरेदीतील घोटाळा उघडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.