महाकाय अजगराला दिले जीवदान; जंगलात सोडले
By प्रशांत माने | Updated: November 8, 2023 17:45 IST2023-11-08T17:45:06+5:302023-11-08T17:45:28+5:30
सध्या मोठ्या प्रमाणात नाग, घोणस, अजगर हे नैसर्गिक अधिवास सोडून भक्षाच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये घुसत आहेत.

महाकाय अजगराला दिले जीवदान; जंगलात सोडले
डोंबिवली: सध्या मोठ्या प्रमाणात नाग, घोणस, अजगर हे नैसर्गिक अधिवास सोडून भक्षाच्या शोधात मानवी वसाहतींमध्ये घुसत आहेत. मंगळवारी रात्री तब्बल अकरा फूट लांबीचा इंडियन रॉक पायथॉन जातीचा महाकाय अजगर येथील पुर्वेकडील कल्याण शीळ मार्गावरील रूणवाल गार्डन परिसरात आढळून आला.
स्थानिक रहिवासी प्रणित पाटील यांना हा अजगर निदर्शनास पडला असता त्यांनी लागलीच याची माहिती सर्पमित्रांना कळवली. यात सेवा संस्थेचे सर्पमित्र गौरव कारंडे, पूर्वेश कोरी, ओमकार सामंत, निहार सकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेत वनक्षेत्रपाल राजू शिंदे यांच्या सहकार्याने नागरी वसाहतीमध्ये घुसलेल्या अजगराला मोठया शिताफीने पकडून जंगलात सोडले. अजगराला ताब्यात घेताच स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.