चार लाख डोंबिवलीकर अंधारात; पडघ्यात बिघाड; अघोषित भारनियमन, रविवारपर्यंत दुरुस्ती झाल्यास मिळेल दिलासा
By अनिकेत घमंडी | Updated: July 19, 2025 09:20 IST2025-07-19T09:20:19+5:302025-07-19T09:20:42+5:30
पडघ्यात तांत्रिक बिघाडानंतर आठवड्यात महापारेषणने सहा टॉवर युद्धपातळीवर उभे केले आहेत. शनिवारी त्या ठिकाणी काम पूर्ण झाले तर रविवारपासून अखंड वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे.

चार लाख डोंबिवलीकर अंधारात; पडघ्यात बिघाड; अघोषित भारनियमन, रविवारपर्यंत दुरुस्ती झाल्यास मिळेल दिलासा
- अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महापारेषणच्या पडघा येथील पाल २२० केव्ही वीज वाहिनीत अडथळे आल्याने जुनी वाहिनी बदलून वीज यंत्रणा पूर्ववत करण्यात अडथळे येत असल्यामुळे कल्याण-डोंबिवलीत महावितरणच्या सुमारे ४ लाख ग्राहकांना आठवडाभर फटका बसत आहे. शहरांतील वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. महावितरणने डोंबिवली शहरात अघोषित भारनियमन सुरू केले.
पडघ्यात तांत्रिक बिघाडानंतर आठवड्यात महापारेषणने सहा टॉवर युद्धपातळीवर उभे केले आहेत. शनिवारी त्या ठिकाणी काम पूर्ण झाले तर रविवारपासून अखंड वीज पुरवठा होण्याची शक्यता आहे. मात्र, या बिघाडाबाबत महावितरण, महापारेषण या यंत्रणांनी चुप्पी साधली. महावितरणच्या डोंबिवली, कल्याण येथील कार्यकारी अभियंत्यांसह अन्य उपविभागीय अधिकाऱ्यांनी याबाबत उघडपणे माहिती देणे टाळले.
एकाच वाहिनीवर विभागाचा भार
आठवड्याभरापासून पावसाचा जोर कमी असून, उकाड्यात वाढ झाल्याने विजेची मागणी वाढली. त्यात दोन वीज वाहिन्यांऐवजी एकाच वाहिनीतून वीज पुरवठा होत असल्याने सर्व भागाचा भार त्या वाहिनीवर येत आहे.
वीज पुरवठ्याचा समतोल साधण्यासाठी महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता भारनियमन सुरू केले.
बिले भरमसाट येत असून, वीज पुरवठा मात्र समाधानकारक नसल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे.
पाणीपुरवठ्यावरही परिणाम
शहरात गेल्या आठवडाभरात असंख्य वेळा वीज खंडित झाल्याने नागरिकांनी महावितरणच्या नावाने संताप व्यक्त केला. समाज माध्यमांवर नागरिक व्यक्त झाले.
अनेक सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठ्याच्याही समस्या निर्माण झाल्या आहेत. महापालिकेने पत्र पाठवून महावितरणच्या सतत वीज खंडित होण्यामुळे भोपरसह विविध भागात पाणी समस्या झाल्याचे म्हटले.
या विभागांत पुरवठा राहणार खंडित
फिडरचे नाव विविध वेळा
बाजीप्रभू : १२ ते १, दु. ३ ते ४, संध्या. ६ ते ७, रात्री ९ ते १०
एमआयडीसी : दु. १ ते २, संध्या. ४ ते ५, ७ ते ८, रात्री १० ते ११
आनंदनगर : दु. २ ते ३, संध्या. ५ ते ६, रात्री ८ ते ९, ११ ते १२
डोंबिवली पश्चिमेकडील महावितरणच्या कार्यालयातून गुरुवारी एक भारनियमन नियोजन केलेला (एरियानुसार) तक्ता केलेले पत्र व्हायरल झाले, अघोषित भारनियमन सुरू असल्याची चर्चा नागरिकांत सुरू झाली आणि दोन्ही यंत्रणांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.