बदलापूर : बदलापुरात माजी नगरसेवकाला अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५० लाखांची खंडणी मागितल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना बेड्या ठोकल्या.
माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना महिन्याभरापूर्वी एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर एक व्हिडीओ आला. या व्हिडिओत त्यांचे अश्लील फोटो होते. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत समोरच्याने त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. सुरुवातीस हा खोडसाळपणा वाटल्याने वडनेरे यांनी दुर्लक्ष केले. मात्र, खंडणीखोरांचा तगादा वाढल्यानंतर वडनेरे यांनी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात तक्रार केली.
तांत्रिक तपास, सुनावली पोलिस कोठडी
अखेर याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण बालवडकर, राजेश गज्जल यांनी तांत्रिक तपास करत बदलापूरमधूनच चौघांना बेड्या ठोकल्या. अक्षय उर्फ बकरी गोविंद जाधव, रोनित दयानंद आडारकर, दीपक मधुकर वाघमारे आणि पुष्कर हरिदास कदम अशी त्यांची नावे आहेत. यांना न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा
या चौघांपैकी अक्षय उर्फ बकरी जाधव आणि दीपक वाघमारे यांच्यावर यापूर्वी अंबरनाथमध्ये एका डॉक्टरच्या घरावर कोट्यवधी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल आहे.
त्या गुन्ह्यातून जामिनावर सुटल्यानंतर झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी वडनेरे यांना खंडणीसाठी धमकी दिली होती.
मोबाइल नंबर नक्षलवादी परिसरातील
ज्या नंबरवरून शैलेश यांना धमकाविण्यात येत होते आणि खंडणी मागण्यात येत होती तो नंबर ओडिसा भागातील नक्षलवादी परिसरामधील असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तेथे जाऊन नंबरचा शोध घेतला. मात्र आरोपींना बदलापुरातून अटक केली.