KDMC च्या टिटवाळ्यातील प्रसूतीगृहात रुग्णाला रुग्णवाहिका मिळण्यास पाच तासाचा विलंब
By मुरलीधर भवार | Updated: December 13, 2024 19:53 IST2024-12-13T19:52:23+5:302024-12-13T19:53:29+5:30
प्रसूतीनंतर महिलेची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी मुंबईला हलविण्याकरीता हवी होती रुग्णवाहिका

KDMC च्या टिटवाळ्यातील प्रसूतीगृहात रुग्णाला रुग्णवाहिका मिळण्यास पाच तासाचा विलंब
मुरलीधर भवार, कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा या प्रसूतीगृहात एका महिलेची प्रसूती झाल्यावर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईला हलविण्याकरीता रुग्णवाहिका हवी होती. रुग्णवाहिका पाच तासाच्या विलंबाने उपलब्ध झाली आहे. याप्रकरणी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याने तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नेमके काय घडले?
महापालिकेच्या टिटवाळा येथील प्रसूतीगृहात प्रसूतीसाठी वैदेही मुंडे दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रसूती झाली. त्यांनी एका बाळाला जन्म दिला. त्यांच्या बाळाची प्रकृती ठीक नसल्याने बाळाला उपचारासाठी महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र बाळाची आई वैदेही यांचीही प्रकृती ठिक नसल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलविणे गरजेचे होते. त्यासाठी रुग्णाहिका उपलब्ध नव्हती. तब्बल पाच तासानंतर ती रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्याचबरोबर याच रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या चैताली भंडारे यांची प्रसूती करण्यातही डॉक्टरांनी विलंब केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन प्रसूतीचा सल्ला दिला होता. त्या त्यासाठी तयार नसल्याने प्रसूती उशिराने शस्त्रक्रियेद्वारेच करण्यात आल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या दोन्ही गटाचे पदाधिकारी आक्रमक
घडलेला प्रकार कळताच शिंदेसेनेचे पदाधिकारी विजय देशेकर यांनी महापालिकेच्या आरोग्य सेवेच्या कारभारावर टीका केली. रुग्णवाहिका पाच तासानंतर उपलब्ध झाली. त्या महिलेच्या जिवाला दगाफटका होऊ शकला असता. महापालिकेने आरोग्य सेवा वेळीच सुधारली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देशेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिला. उद्धवसेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनीही या प्रकरणी तीव्र भूमिका मांडली. अधिकाऱ्यांनाच या रुग्णालयात अँडमिट करावे लागेल, तेव्हा या रुग्णालयांच्या आरोग्य सेवा सुधारतील, अशी खोचक टीका त्यांनी केली.
या प्रकरणी उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, महापालिकेकडून रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यास विलंब झाला. मात्र महिलेला मुंबईतील रुग्णालयात पाठविले आहे. त्याचबरोबर अन्य एका महिलेची प्रसूती देखील करण्यात आली आहे. महापालिकेकडे सध्या १४ रुग्णवाहिका आहे. त्यापैकी एक रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. आणखीन ९ रुग्णवाहिका खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. लवकर ९ रुग्णवाहिका दाखल होती. त्यामुळे रुग्णवाहिकांची एकूण संख्या लवकरच २३ इतकी होईल.