मृत्यूपेक्षाही बेघर होण्याची भीती अधिक; धोकादायक इमारती करत नाहीत स्ट्रक्चरल ऑडिट
By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2025 15:07 IST2025-05-21T15:06:55+5:302025-05-21T15:07:58+5:30
कल्याण : कल्याण -डोंबिवली महापालिका हद्दीत ५१३ धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची कुठलीही व्यवस्था ...

मृत्यूपेक्षाही बेघर होण्याची भीती अधिक; धोकादायक इमारती करत नाहीत स्ट्रक्चरल ऑडिट
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ५१३ धोकादायक व अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवाशांच्या पर्यायी निवासाची कुठलीही व्यवस्था नाही हेच दारुण वास्तव कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील सप्तशृंगी या धोकादायक इमारतीच्या दुर्घटनेतून अधोरेखित झाले.
पालिकेने एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिधोकादायक इमारतींची संख्या १६९ आहे, तर धोकादायक इमारतींची संख्या २९३ आहे. अतिधोकादायक इमारती महापालिकेकडून पाडण्यात येतात. मात्र त्यामधील घरे लोकांनी सोडली नाहीत तर त्या पाडण्यात अडचणी येतात. धोकादायक इमारतींना पालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडून नोटिसा पाठविल्या जातात. या इमारती पावसाळ्यापूर्वी रहिवासमुक्त कराव्यात अथवा स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे नाेटीसमध्ये सूचित असते. दुर्घटनाग्रस्त सप्तशृंगी इमारतीलाही पालिकेने धोकादायक इमारतीची नोटीस बजावली होती व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते.
ऑडिटमध्ये इमारत धोकादायक असल्याचा अहवाल आला तर जायचे कुठे, असा प्रश्न रहिवाशांना भेडसावतो. घर सोडायला लागण्याच्या भीतीपोटी स्ट्रक्चरल ऑडिट टाळण्याकडे नागरिकांचा कल असतो. धोकादायक इमारतीचा पुनर्विकासासाठी पालिकेच्या नगररचना खात्याकडून परवानगी दिली जाते. मात्र जागामालक, भाडेकरू आणि बिल्डर यांच्यात एकमत होत नाही. त्यामुळे पुनर्विकासाच्या प्रस्तावांना प्रतिसाद मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात धाेकादायक इमारती पाडण्याच्या कामाला वेग आला होता. त्यामुळे अशा इमारतींची संख्या कमी झाली होती.
क्लस्टरचे घोंगडे भिजत
२०१५ मध्ये ठाकुर्लीतील ‘मातृछाया सदन’ ही इमारत पडली. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाकरिता क्लस्टर योजना राबविली जाईल, असे म्हटले होते.
पालिकेने क्लस्टर योजनेचा प्लान तयार केला. क्लस्टर योजना ४१ ठिकाणी राबविली जाणार आहे. त्यापैकी कल्याण कोळसेवाडी आणि डोंबिवली आयरे दत्तनगर परिसरात प्रथम राबविली जाणार आहे. त्यासाठी १० कोटी मोजून बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी कंत्राटदार नेमला.
कल्याण-कोळसेवाडीचे सर्वेक्षण ९० टक्के झाले. मात्र डोंबिवली आयरे दत्तनगर परिसरातील सर्वेक्षणाचे काम ४० टक्के झाले. सर्वेक्षणाचे काम थांबल्याने कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली.
पालिका काय करणार?
डोंबिवलीतील आयरे परिसरात ‘आदिनारायण’ ही धोकादायक इमारत २०२३ मध्ये पडल्याने दोन जणांचा मृ्त्यू झाला. त्याच घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी कल्याण पूर्वेत घडली. यामध्ये सहा जणांचा जीव गेला. आता महापालिका काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे.