उल्हासनगरच्या सेंच्यूरी कंपनीत नकली कुपन्सचा पर्दाफाश; ७८ हजारांची कुपन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
By सदानंद नाईक | Updated: September 12, 2025 16:41 IST2025-09-12T16:40:30+5:302025-09-12T16:41:06+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील सेंच्यूरी रेयॉन कंपनीत चार हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. कामगारांना नाष्टा, भरपेट जेवण, चहा स्वस्त किंमतीत मिळण्यासाठी कंपनीच्या आवारात एक कॅन्टीन आहे.

उल्हासनगरच्या सेंच्यूरी कंपनीत नकली कुपन्सचा पर्दाफाश; ७८ हजारांची कुपन जप्त, तिघांवर गुन्हा दाखल
- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहाड गावठाण येथील सेंच्यूरी रेयॉन कंपनीच्या कँटीनमध्ये नकली कुपन्स रॅकेटचा पर्दाफाश झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ७८ हजार रुपयांची नकली कुपन्स जप्त केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील सेंच्यूरी रेयॉन कंपनीत चार हजार पेक्षा जास्त कामगार काम करतात. कामगारांना नाष्टा, भरपेट जेवण, चहा स्वस्त किंमतीत मिळण्यासाठी कंपनीच्या आवारात एक कॅन्टीन आहे. त्यासाठी कामगारांना कुपन्स दिली जातात. मात्र कंपनीच्या नेहमीच्या प्रिंटर्स मालकाकडून कुपन्सची छपाई होत नसल्याने, मालकाने कंपनीशी संपर्क साधून कुपन्स छपाईचे काम दुसऱ्या कुणाला दिले आहे का?. याबाबत विचारणा केली. त्यावेळी कोणालाही कुपन्स छापण्याचा ठेका दिला नसल्याचे कंपनी प्रशासनाने स्पष्ट केल्यावर, मग कुपन्स कोण छापते? असा प्रश्न निर्माण झाला. कंपनीने उल्हासनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांना पत्र देऊन चौकशीची मागणी केली होती.
पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहायक आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड, पोलीस निरीक्षक(गुन्हे)लक्ष्मण कांबळे, उपनिरीक्षक दीपक यादव यांनी प्रेस बाजारात झाडाझडती घेतली. तेंव्हा सेन्युरी रेयॉन कंपनीतील कॅन्टीन डिपार्टमेन्टमध्ये मेस बॉयचे काम करणारा श्याम यशवंत जाधव याने कंपनीतील कॅन्टीन मधील नाश्ता, चहा व पावची कुपने विश्वासघात करून घेतली. आणि त्याने सोलमन उर्फ सुलेमान पंडीत याच्या करवी सर्वेश प्रिन्टींग प्रेसचे मालक अमोल सुर्यवंशी यांना छपाई करण्यासाठी दिल्याचे उघड झाले. सोलमन उर्फ सुलेमान पंडीत व अमोल सुर्यवंशी यांनी कोणत्याही प्रकारचे कंपनीचे ऑर्डर पत्र नसतांना व कंपनीची परवानगी न घेता नाश्ता, चहा व पावची बनावट कुपनांची छपाई करून, कंपनीची फसवणुक केल्याचे उघड झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या आदेशानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.