कल्याण-डोंबिवलीत आरक्षणानंतरही अनेकांचे राजकीय भवितव्य धूसर
By मुरलीधर भवार | Updated: November 12, 2025 13:23 IST2025-11-12T13:23:29+5:302025-11-12T13:23:46+5:30
KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने व प्रभागांतर्गत सीमारेषा निश्चित झाल्या नसल्याने आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरही इच्छुकांना पत्ता कट झालाय की, आपल्याकरिता एखादा सुरक्षित वॉर्ड उपलब्ध झाला, याचा अंदाज बांधता आला नाही.

कल्याण-डोंबिवलीत आरक्षणानंतरही अनेकांचे राजकीय भवितव्य धूसर
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रथमच बहुसदस्यीय पद्धतीने होत असल्याने व प्रभागांतर्गत सीमारेषा निश्चित झाल्या नसल्याने आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यानंतरही इच्छुकांना पत्ता कट झालाय की, आपल्याकरिता एखादा सुरक्षित वॉर्ड उपलब्ध झाला, याचा अंदाज बांधता आला नाही. पक्षात वजन असलेले व गडगंज पैसा असलेले इच्छुक प्रभागातील त्यांना अनुकूल वॉर्डावर दावा सांगतील, अशी भावना काही माजी नगरसेवकांनी व्यक्त केली. प्रस्थापित सोय लावून घेतील.
प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वॉर्डांचे आरक्षण जाहीर झाले. मात्र, प्रभागातील ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ या वॉर्डांना नाव दिलेले नाही. अंतर्गत सीमारेषा निश्चित केलेल्या नाही. त्यामुळे जाहीर केलेले आरक्षण नेमके कोणाचे नशीब उजळवणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. १२२ जागांकरिता ३१ पॅनलमध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’नुसार आरक्षणाची सोडत जाहीर केली. आरक्षणाचे नेमके परिणाम कसे होणार, हेच अनेकांना न उमजल्याने आरक्षण सोडतीच्या ठिकाणी काहीसे उदासीनतेचे वातावरण होते.
२ डिसेंबरला अंतिम प्रारूप
आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना घेण्याकरिता १७ ते २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. हरकती पश्चात निवडणूक आयोगाला अंतिम मान्यतेसाठी प्रभाग आरक्षणाचे प्रारूप पाठवले जाईल. आयोगाच्या अंतिम मान्यतेनंतर २ डिसेंबर रोजी प्रभाग आरक्षणाचे अंतिम प्रारूप प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली.
अनुसूचित जातीकरिता १२ जागा आरक्षित व त्यापैकी सहा जागा महिलांकरिता
अनुसूचित जमातीकरिता तीन जागा आरक्षित व त्यापैकी दोन जागा महिलांकरिता
इतर मागासवर्गीय प्रवर्गाकरिता ३२ जागा आरक्षित व त्यापैकी १६ जागा महिलांकरिता
खुल्या प्रवर्गाकरिता ७५ जागा व त्यापैकी ५० टक्के महिलांकरिता