१५ सोसायट्यांमध्ये पाणीपंपांसाठी वीजचोरी उघडकीस, अडवली-ढोकळीतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:31 IST2020-12-26T00:30:59+5:302020-12-26T00:31:17+5:30
Dombivali : महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग १ अंतर्गत वीजचोरांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या मोहिमेत अडवली-ढोकळी येथील १५ सोसायट्यांकडून पाणीपंप व पॅसेजसाठी वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे.

१५ सोसायट्यांमध्ये पाणीपंपांसाठी वीजचोरी उघडकीस, अडवली-ढोकळीतील प्रकार
डोंबिवली : कल्याण पूर्वेतील अडवली-ढोकळी येथील १५ गृहनिर्माण सोसायट्यांनी पॅसेज व पाणीपंपासाठी बेकायदा विजेचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. त्याचबरोबर अन्य २८० जणांनीही वीजचोरी केली आहे. या चोरट्यांनी सुमारे दोन लाख ६० हजार युनिटची जवळपास २८ लाख रुपयांची वीजचोरी केली आहे.
महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग १ अंतर्गत वीजचोरांविरुद्ध कारवाई सुरू आहे. या मोहिमेत अडवली-ढोकळी येथील १५ सोसायट्यांकडून पाणीपंप व पॅसेजसाठी वीजचोरी केल्याचे आढळून आले आहे. याच भागात अन्यत्र गुरुवारपर्यंत २८० वीज चोरांविरुद्ध कारवाई करण्यात आली. अडवली-ढोकळी भागातील वीजग्राहकांना घरगुती व सोसायट्यांच्या पाणीपंप व पॅसेजसाठीचे वीजमीटर बसविले असल्याची व या मीटरचे रीडिंगनुसार वीजबिल येत असल्याची खात्री करावी. वीजबिलाची रक्कम भरुन परवानाधारक कंत्राटदार अथवा व्यक्तींकडून वायरिंगचे काम करून घ्यावे, असे आवाहन अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र प्रजापती, साहाय्यक अभियंते रोशन तिरपुडे यांनी केले आहे.
दंडाच्या नोटिसा बजावल्या
चोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा करण्याबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या रकमेचा भरणा न करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात फिर्याद दाखल करणार असल्याचे महावितरणने प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.