उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री; पोलिसांकडून बॅनर जप्त
By मुरलीधर भवार | Updated: May 27, 2023 19:32 IST2023-05-27T19:06:31+5:302023-05-27T19:32:25+5:30
हा बॅनर लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केला विरोध, पोलिसांनी जप्त केला बॅनर

उन्हाळ्यात खात संत्री, हरवले आहेत आमचे पालकमंत्री; पोलिसांकडून बॅनर जप्त
कल्याण- उन्हाळ्यात खात संत्री हरवले आहेत आमचे पालकमंत्री या आशयाचा बॅनर लावण्याचा प्रयत्न करणाऱ््या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां ना पोलिसांनी विरोध केला. त्यांचा हा बॅनर पोलिसानी जप्त केला आहे. या बॅनरवर पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री झाल्यापासून आपला पत्ता कुठेच लागत नाही. तुम्ही जिथे कुठे ही असाल तिथून परत या आम्ही तुमची वाट पाहतोय असा मजकूर लिहिला होता. हा बॅनर तयार करुन तो ठाकरे गटाचे पदाधिकारी लावणार हे कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेत ताे जप्त केला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर ते जिल्हा नियोजन समिती बैठकांना उपस्थित राहिले .मात्र जिल्ह्याचा दौरा केलेला नाही . त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत देसाई यांना टिकेचे लक्ष्य केले आहे. आज ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी हा बॅनर तयार केला होता. तो छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्याचा प्रयत्न केला. बॅनर जप्त केल्याने भोईर सांगितले की, सरकार पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही करीत आहे. कल्याण डोंबिवलीकर समस्यांनी ग्रासले आहेत त्यात पालकमंत्री एकदाही कल्याण डोंबिवलीत आले नाहीत. मग आम्ही साधा बॅनर लावून देखील प्रश्न उपस्थित करायचा नाही का. लोकशाहीत अभिव्यक्त होण्याचा अधिकार सरकार हिरावून घेत आहे.