डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त
By प्रशांत माने | Updated: September 20, 2022 16:28 IST2022-09-20T16:26:29+5:302022-09-20T16:28:03+5:30
पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १४ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा गुटखा आढळून आला.

डोंबिवली: गुटख्याची तस्करी सुरूच, १४ लाखांचा गुटखा जप्त
डोंबिवली: काही दिवसांपुर्वीच ठाकुर्ली कांचनगाव येथील एका घरातून ७१ हजार ३६८ रूपये किमतीचा गुटखा टिळकनगर पोलिसांनी जप्त केला होता. असं असताना मानपाडा पोलिसांना सोमवारी केलेल्या कारवाईत एका वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये तब्बल १४ लाख ५९ हजार ५०० रूपयांचा गुटखा आढळून आला.
याप्रकरणी ट्रकचालक अब्दुल सज्जाक अब्दुल रज्जाक चौधरी (वय ३४) रा. दिवा शिळफाटा याच्यासह गुटखा पुरवठा करणारा मुन्ना उर्फ सफीक शेख रा. ठाणे यालाही अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या वडवली गावाच्या रोडलगत करण्यात आली. याआधीही गुटखा बाळगणे तसेच त्याची वाहतूक करणे या गुन्ह्यात मानपाडा पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात आली आहे. मात्र अद्यापही शहरामध्ये गुटख्याची तस्करी सुरूच असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आले आहे.