Dombivali rickshaw pullers will now charge less than one rupee? | डोंबिवलीचे रिक्षावाले आता एक रुपया घेणार कमी?

डोंबिवलीचे रिक्षावाले आता एक रुपया घेणार कमी?

अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : महाविकास आघाडी सरकारने प्रवाशांवर अन्यायकारक तीन रुपयांची भाडेवाढ लादली आहे. सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षांकरिता १८ रुपये भाडे निश्चित केले असताना गेली काही वर्षे पैसे सुट्टे नाहीत, असे सांगत रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून अतिरिक्त दोन रुपये उकळत २० रुपये वसूल केले. आता २१ रुपये रिक्षाभाडे केल्यावर प्रवाशांकडे सुट्टा एक रुपया नसल्यास हेच रिक्षाचालक एक रुपयाकरिता अडून बसण्याची भीती प्रवाशांना वाटत आहे. मात्र, प्रवाशांकडे सुटे पैसे नसल्यास २० रुपये दिले तरी चालतील, अशी भूमिका भाजप व शिवसेनाप्रणीत रिक्षा युनियनने घेतली आहे. अर्थात, सध्या दोन प्रवासी रिक्षात बसवून प्रत्येकाकडून २० रुपये भाडे वसूल करून प्रवाशांची बेसुमार लूट रिक्षाचालकांकडून सुरू आहे. ती तत्काळ थांबवण्याची मागणी प्रवासी संघटना करीत आहेत.


शेअर पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या रिक्षातील एका प्रवाशाकडून १० रुपये भाडे वसूल केले जात होते. रिक्षाचालक त्यांच्या शेजारील अर्ध्यामुर्ध्या सीटवर बेकायदा चौथी सीट बसवून त्या प्रवाशाकडूनही १० रुपये भाडे वसूल करीत होते. कोरोनामुळे सध्या केवळ दोन प्रवासी रिक्षात बसवले जातात. या दोन्ही प्रवाशांकडून प्रत्येकी २० रुपये याप्रमाणे चार सीटचे पैसे उकळले जात आहेत. 
मुळात जी चौथी सीट बेकायदा आहे, त्या सीटचे भाडे वसूल करण्याचा अधिकार रिक्षाचालकांना कुणी दिला? त्यामुळे शेअर रिक्षाचे भाडे हे २० रुपये आकारणे, ही राजरोस लूट असून प्रवाशांना नाडण्याचा प्रकार आहे. अनेक नोकरदार प्रवाशांच्या पगारात कपात झाली आहे. अनेकांच्या घरातील सदस्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोनाकाळात हॉस्पिटलची बिले भरल्यामुळे त्यांची पुंजी संपली 
आहे. 


मात्र, केवळ रिक्षाचालक हेच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत असल्याचे भासवून बेसुमार लूटमार केली जात आहे. प्रोटेस्ट अगेनस्ट ऑटोवाला या प्रवासी संघटनेने केलेल्या मागणीनुसार दोन प्रवासी रिक्षात बसल्यावर प्रत्येकाकडून केवळ १२ रुपये घ्यावेत. 
दोन प्रवाशांकडून १२ रुपये घेतले, तरी रिक्षाचालकाला २४ रुपये म्हणजे थेट प्रवासी घेऊन गेल्यावर मिळणार त्यापेक्षा तीन ते चार रुपये जास्त मिळणार आहेत. मात्र, रिक्षा युनियनचे पदाधिकारी आरटीओने पुन्हा सर्व्हे करून शेअर रिक्षाचे भाडे ठरवावे, अशी सोयीस्कर भूमिका घेत आहेत.

समस्या असल्यास फोन करण्याचे वाहतूक पोलिसांचे आवाहन
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन प्रवासी घेऊनच रिक्षा प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालक, प्रवाशांना उद्देशून इंदिरा गांधी चौकात जाहीर फलकाद्वारे केले आहे. कोणालाही समस्या असल्यास ०२५१-२८६०१४६ या क्रमांकावर संपर्क साधवा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

भाडेवाढ प्रस्तावाचे आम्ही स्वागत करतो. त्यामुळे स्वतंत्र रिक्षासाठी प्रवाशांकडे एक रुपया सुट्टा नसेल, तर मात्र २० रुपये आकारावे, असे आवाहन आम्ही रिक्षाचालकांना केले आहे.
    - दत्ता माळेकर,  अध्यक्ष, वाहतूक     सेल, भाजप, कल्याण जिल्हा


प्रवाशांकडे एक रुपया नसेल तर त्यांनी २० रुपये द्यावेत, आमची हरकत नाही. तसेच शेअर पद्धतीच्या भाड्यासंदर्भात आरटीओने पुन्हा सर्व्हे करावा आणि त्यातून सुधारित भाडेवाढ करावी. आम्ही त्याची अंमलबजावणी करण्यास सहकार्य करू.
    - शेखर जोशी, उपाध्यक्ष, रिक्षा-चालक-                
    मालक युनियन, डोंबिवली पश्चिम

Web Title: Dombivali rickshaw pullers will now charge less than one rupee?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.