उल्हासनगरात शाळकरी मुलीवर श्वानाचा हल्ला; नागरिकांच्या मदतीने मुलगी सुरक्षित
By सदानंद नाईक | Updated: August 2, 2025 18:59 IST2025-08-02T18:57:44+5:302025-08-02T18:59:34+5:30
श्वानांनी केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीमध्ये कैद

उल्हासनगरात शाळकरी मुलीवर श्वानाचा हल्ला; नागरिकांच्या मदतीने मुलगी सुरक्षित
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-५, मच्छी मार्केट रस्त्याने जाणाऱ्या एका शाळेकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मात्र ऐक इसम मुलीच्या मदतीला धावल्याने, मुलीचा जीव वाचला. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
उल्हासनगर महापालिकेने श्वानाचे निर्बीजीकरण प्रक्रिया सुरु केल्यानंतरही, भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नाही असा आरोप नागरिक करीत आहे. दरम्यान कॅम्प नं-५, मच्छी मार्केट मधील रस्त्याने ऐक शाळकरी मुलगी जात असताना काही भटक्या कुत्र्यांनी मुलीवर हल्ला चढवून मुलीच्या हाताचे व पायाचे लचके तोडत होते. त्यावेळी ऐक इसम मुलीच्या मदतीला धावल्याने मुलीचा जीव वाचला. तर दुसऱ्या एका इसमाने कुत्र्यांना हाकलून लावले. सदर घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद होऊन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून मुलीचे नाव व ती कुठे राहते. ते अद्याप उघड झाले नाही. शहरांत भटक्या कुत्र्याची संख्या श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया सूरु झाल्यानंतर, कमी झाली नाही असे चित्र आहे.
महापालिका आरोग्य विभागाचे श्वान पकडण्याचे पथक, कॅम्प नं -५ मच्छी मार्केट परिसरात भटक्या कुत्र्याच्या शोधासाठी पिरत आहे. भटक्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महिन्याला ४०० पेक्षा जास्त कुत्र्यांनी चावा घेतल्याची नोंद शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात होत आहे.