महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन; बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित
By अनिकेत घमंडी | Updated: March 15, 2024 19:05 IST2024-03-15T19:02:26+5:302024-03-15T19:05:34+5:30
बदलापूर पूर्व आणि पश्चिम तसेच मुरबाड या तीन उपविभागांचा यात समावेश

महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागाचे विभाजन; बदलापूर विभागीय कार्यालय कार्यान्वित
अनिकेत घमंडी, डोंबिवली: भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या कल्याण ग्रामीण विभागाचे ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरणने विभाजन केल्याचे शुक्रवारी जाहीर केले. कल्याण ग्रामीण विभागातून बदलापूर विभागाची निर्मिती करण्यात आली असून बदलापूर पूर्व आणि पश्चिम तसेच मुरबाड या तीन उपविभागांचा यात समावेश करण्यात आला आहे.
नवनिर्मित बदलापूर विभागीय कार्यालय खरवई पॉवर हाऊस, डीपी रोड, बदलापूर पूर्व येथे कार्यान्वित करण्यात आले असून संबंधित ग्राहकांनी या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. कल्याण ग्रामीण विभागात पाच उपविभागांचा समावेश होता. या विभागात आता शहापूर आणि टिटवाळा हे दोनच उपविभाग शिल्लक आहेत.
उर्वरित बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम आणि मुरबाड उपविभागांचा समावेश असलेल्या बदलापूर विभागीय कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या विभागात २ लाख २१ हजार ग्राहक असून ११ स्विचिंग उपकेंद्र, १ हजार ७३१ रोहित्र, १ हजार २६ किलोमिटर उच्चदाब आणि २ हजार ३९४ किलोमिटर लघुदाब वीजवाहिन्या आहेत. कुळगाव एक आणि दोन, कुळगाव एमआयडीसी, कुळगाव ग्रामीण, मांजर्ली एक आणि दोन, बदलापूर ग्रामीण, मुरबाड शहर आणि ग्रामीण, सरळगाव, धसई, शिरोशी अशी बारा शाखा कार्यालये बदलापूर विभागांतर्गत कार्यरत असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले.