परमबीर सिंगांवरील गुन्हा बाजारपेठ ठाण्यात वर्ग; बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 06:05 AM2021-05-01T06:05:08+5:302021-05-01T06:10:02+5:30

बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष

Crime in Parambir Singh Class in Bazarpeth Thane | परमबीर सिंगांवरील गुन्हा बाजारपेठ ठाण्यात वर्ग; बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष

परमबीर सिंगांवरील गुन्हा बाजारपेठ ठाण्यात वर्ग; बांधकाम फसवणूक प्रकरणात केले दुर्लक्ष

Next

कल्याण : मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह ३३ जणांवर ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विविध कलमांसह २७ कलमान्वये अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात २८ एप्रिलला दाखल झालेला गुन्हा कल्याण शहरातील एका प्रकरणाशी संबंधित असल्याने हा गुन्हा स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

दि. ६ ऑक्टोबर २०१३ रोजी घाडगे बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले होते. याठिकाणी कार्यरत असताना एका बांधकाम प्रकरणातील फसवणुकीचा गुन्हा त्यांच्याकडे तपासकामी होता. या प्रकरणात मृत व्यक्तीच्या नावाने बांधकाम परवानगी घेण्यात आली होती. यात तब्बल २६ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. यात बांधकाम व्यावसायिकांसह कल्याण-डोंबिवली महापालिकेतील तत्कालीन तीन आयुक्त आणि नगररचना विभागातील अन्य अधिकाऱ्याचा समावेश आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात भक्कम पुरावे असताना या पुराव्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी संबंधित गुन्ह्यातून मनपा आयुक्त आणि अन्य अधिकाऱ्यांची नावे वगळा, असे आदेश देत माझ्यावर दबाव आणल्याचा आरोप घाडगे यांचा आहे. यात सिंग यांना तत्कालीन स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचीही साथ लाभल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे घाडगे यांनी दाखल केलेल्या तक्रारीत परमवीर सिंग यांच्यासह तत्कालीन चार पोलीस उपायुक्त आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यातून शुक्रवारी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला असून, कल्याणचे विद्यमान सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार या गुन्ह्याचा तपास करणार आहेत. दरम्यान, यासंदर्भात अधिक माहिती मिळण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत  चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद  मिळाला नाही.

 

Web Title: Crime in Parambir Singh Class in Bazarpeth Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.