कल्याण - कल्याण तालुक्यात 10 मे ते 14 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचे एक पत्रक शुक्रवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या पत्रकामुळे नागरिकांमध्येही गोंधळ निर्माण झाला. कडक निर्बंधाबाबत शहरात अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात येत्या 10 मे पासून 14 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचा केवळ प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे. यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांनी "लोकमतशी" बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच सोशल मिडियावर व्हायरल झालेला मेसेजही चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता खबरदारीचा उपाय म्हणून कडक निर्बंध लागू करण्याबाबतचा फक्त प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेली प्रत समोर न आणता केवळ कडक निर्बंधांचे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावर अंतिम निर्णय झाल्यास त्याची पूर्वसूचना दिली जाईल अशी माहिती दीपक आकडे यांनी दिली. व्हायरल झालेल्या पत्रावरून नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडालेला असून कल्याण तालुक्यासह कल्याण डोंबिवली शहरातही लॉकडाऊन होणार की काय अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन शासकीय यंत्रणांनी केले आहे.मात्र तहसील कार्यालयातली महत्वाची कागदपत्रे व्हायरल होतात कशी काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे.
Coronavirus: सोशल मीडियावर व्हायरल झालेला "तो" मेसेज चुकीचा, कल्याणच्या तहसीलदारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:47 IST