शहरांतील तलावांची स्वच्छता उत्सव काळापुरतीच मर्यादित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 12:01 AM2020-11-25T00:01:01+5:302020-11-25T00:01:34+5:30

डोंबिवलीत जलपर्णीचा विळखा : कल्याणमध्ये कचऱ्याचे ढीग

The cleaning of ponds in cities is limited to the festival period | शहरांतील तलावांची स्वच्छता उत्सव काळापुरतीच मर्यादित

शहरांतील तलावांची स्वच्छता उत्सव काळापुरतीच मर्यादित

googlenewsNext

कल्याण : गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या धर्तीवर केडीएमसीच्या वतीने हद्दीतील सर्वच तलावांची स्वच्छता केली जाते; पण उत्सव संपताच या तलावांकडे दुर्लक्ष केले जाते. हे वास्तव डोंबिवलीतील खंबाळपाडा असो अथवा कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी तलावाची अवस्था पाहता समोर येते. खंबाळपाडा तलावाला जलपर्णीचा विळखा पडला आहे, तर बंदिस्त लोखंडी गेट आणि जाळीचे कम्पाउंड बांधूनही विठ्ठलवाडी तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.

महापालिकेच्या हद्दीत ४२ तलाव आहेत. वाढत्या नागरीकरणात पाणीपुरवठ्याचे पर्यायी स्रोत उपलब्ध होऊ लागले, तसतसा तलावांचा वापर नागरिकांकडून कमी होऊ लागला. तलावांचा वापर कमी झाल्याने हे तलाव गाळ, मातीने भरून गेले आहेत. झुडपांची तसेच जलपर्णीची वाढ झाल्याने हे तलाव आहेत की माळरान अशी काही तलावांची अवस्था झाली आहे. कल्याण पश्चिमेतील काळा तलाव असो अथवा टिटवाळ्यातील गणपती मंदिर तलाव हे याबाबतीत अपवाद आहेत. अन्य तलावांच्या बाबतीत मात्र प्लास्टिक पिशव्या, कचरा, पूजेचे साहित्य टाकण्याचे एकमात्र ठिकाण म्हणून त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 
दरम्यान, तलावांची स्वच्छता उत्सव काळापुरतीच मर्यादित राहते आणि उत्सव संपताच तलावांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. खंबाळपाडा तलावाची सद्य:स्थिती पाहता याची प्रचिती येते. या तलावाला जलपर्णीचा विळखा पडला आहे. काही प्रमाणात निर्माल्याचा कचराही तलावात दिसून येतो.

लोखंडी गेट उभारूनही दुरवस्था कायम
कल्याण पूर्वेकडील विठ्ठलवाडी तलावाची अवस्थादेखील फारशी चांगली नाही. या तलावात सर्रासपणे निर्माल्यासह अन्य कचरा नागरिकांकडून टाकला जात होता. परंतु आता याला लोखंडी गेट लावून कुलूप लावण्यात आले आहे. तलावाभोवती लोखंडी जाळ्यांचे कम्पाउंडही टाकण्यात आले आहे. परंतु सद्य:स्थितीला तलावाच्या पाण्यात कचरा दिसत नसला तरी तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत.  

Web Title: The cleaning of ponds in cities is limited to the festival period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.