पाण्यासाठी MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक; अधिकाऱ्यांना विचारला जाब
By अनिकेत घमंडी | Updated: March 20, 2023 13:40 IST2023-03-20T13:39:47+5:302023-03-20T13:40:18+5:30
मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा पुढाकार

पाण्यासाठी MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक; अधिकाऱ्यांना विचारला जाब
डोंबिवली- एमआयडीसी मधील मिलापनगर/सुदर्शन नगर मधील रहिवाशांना गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा दाब हा अतिशय कमी झाल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याबद्दल सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता संतप्त नागरिकांनी एमआयडीसी डोंबिवली कार्यालयावर धडक देऊन तेथील पाणी पुरवठा खात्याचा अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यात पाणी पुरवठा दाब पूर्ववत करण्याची प्रमुख मागणी होती, तसेच जर पाणी पुरवठा मध्ये सुधारणा न झाल्यास भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
याप्रसंगी एमआयडीसी पाणी पुरवठा खात्याचे सहाय्यक अभियंता विजय धामापुरकर यांना रहिवाशांच्या सह्यांचे मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन तर्फे निवेदन देण्यात आले. एमआयडीसी पाणी पुरवठा बाबतीत ताबडतोब सुधारणा करण्यात येईल असे आश्वासन धामपूरकर यांनी यावेळी नागरिकांना दिले. त्यावेळी मिलापनगर रेसिडेंट वेलफेअर असोसिएशनचा अध्यक्षा वर्षा महाडिक, अरुण जोशी, आनंद दामले, राजु नलावडे, मुकुंद देव, विश्राम परांजपे, मिलिंद जोशी, संजय चव्हाण, सचिन माने, अविनाश दुसाने, वनिता कोरगांवकर, निवृत्ती गावकर, समीर गोखले, सौ शिल्पा भोर, राजश्री देशमुख, राजेंद्र नांदेडकर विश्राम परांजपे यांच्यासह महिला पुरुष रहिवासी उपस्थित होते.