वीजचोर जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; २५ लाख ८५ हजार रुपयांच्या वीजचोरीचे प्रकरण
By अनिकेत घमंडी | Updated: January 24, 2023 19:24 IST2023-01-24T19:24:15+5:302023-01-24T19:24:26+5:30
उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांने वीजचोरी पकडलेल्या जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

वीजचोर जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल; २५ लाख ८५ हजार रुपयांच्या वीजचोरीचे प्रकरण
डोंबिवली: उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी मंडल स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांने वीजचोरी पकडलेल्या जीन्स वाशिंग कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. टिटवाळ्यातील गुरवली पाडा स्थित या कंपनीने मीटर बायपास करून तब्बल २५ लाख ८५ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. जागामालक व कंपनीच्या चालकाविरुद्ध वीज कायदा २००३ कलमानुसार मुरबाड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली .
वीज ग्राहक विकास बबन दळवी व वापरकर्ता ब्रिजमोहन प्रजापती अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पथकाने १७ जानेवारीला गुरवली पाड्यातील काळू नदी ब्रिजजवळील क्रमांक ५३६/१३ गाळाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. सखोल तपासणी केली असता मीटरकडे येणारी केबल छतावर कट करून टॅपिंग केल्याचे आढळले. मीटर टाळून या टॅपिंग केलेल्या केबलच्या साहाय्याने वीजचोरी सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार वीजचोरीचे देयक भरण्याबाबत नोटीस बजावण्यात आली.
मात्र विहित मुदतीत रकमेचा भरणा न झाल्याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुरबाड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक प्रसाद पांढरे पुढील तपास करत आहेत. या कारवाईत सहायक अभियंते धनंजय पाटील, अभिषेक कुमार, कनिष्ठ अभियंता अपर्णा शेलार-सकपाळ, तंत्रज्ञ विजय बावणे, बाह्यस्त्रोत कर्मचारी जयेश वावरे यांनी सहकार्य केले.