महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडळांची चमकदार कामगिरी
By अनिकेत घमंडी | Updated: February 5, 2024 17:21 IST2024-02-05T17:17:04+5:302024-02-05T17:21:13+5:30
महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडळांची चमकदार कामगिरी
अनिकेत घमंडी,डोंबिवली:महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा छत्रपती संभाजीनगर येथे १ ते ४ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झाल्या. या स्पर्धेत कल्याण-रत्नागिरी परिमंडलाच्या संयुक्त संघाने सांघिक व वैयक्तिक क्रीडा प्रकारात ३ सुवर्ण व ७ रौप्यपदके पटकावत चमकदार कामगिरी केली. तर कबड्डीत या संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. सांघिक क्रीडा प्रकारात कबड्डी (पुरूष) हा संघ विजेता तर क्रिकेट (पुरुष) हा संघ उपविजेता ठरला. टेबल टेनिस सांघिक (महिला) रंजना तिवारी, प्राची ठाकरे व अश्विनी साळवे यांनी रौप्यपदक पटकावले.
वैयक्तिक क्रीडा प्रकारात लांब उडीत अमित हुमणे, बुध्दिबळात रंजना तिवारी यांनी सुवर्णपदके पटकावली. १०० व २०० मीटर धावण्यात मेघा जुनघरे, भाला फेकीत हर्षला मोरे, टेबल टेनिस एकेरीत रंजना तिवारी, टेबल टेनिस दुहेरीत अविनाश पवार व अशोक बामगुडे यांनी रौप्यपदके पटकावली. विजेत्या संघ व खेळाडूंचे प्रभारी मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधिक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, महेश अंचिनमाने, सहाय्यक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी अभिनंदन केले आहे.