डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासंतास वेटिंगवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:14 IST2021-04-21T00:14:16+5:302021-04-21T00:14:16+5:30

शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीवर ताण 

Bodies for hours waiting for cremation in Dombivli | डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासंतास वेटिंगवर 

डोंबिवलीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह तासंतास वेटिंगवर 



अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क 
डोंबिवली : काेराेना काळात रुग्णालयात बेड मिळवताना दमछाक हाेत असतानाच आता मरणानंतरही अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत तासन् तास प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे नातेवाइकांचे हाल हाेत असून या प्रतीक्षेमुळे मरणयातना भाेगाव्या लागत असल्याचे चित्र स्मशानभूमीत दिसत आहे. शहरात पाच स्मशानभूमी आहेत. त्यात शिवमंदिर स्मशानभूमीत चांगल्या सुविधा आहेत. पश्चिमेतील मोठा गाव, कुंभारखान पाडा या ठिकाणी सुविधांअभावी काेणी जाण्यास फारसे उत्सुक नसते. त्यामुळे पूर्वेतील शिवमंदिर स्मशानभूमीवर ताण पडत आहे.
पाथर्ली, ठाकुर्लीतील चोळेगाव येथेही अशीच स्थिती आहे. सध्या कोविड रुग्णांचे मृत्यू वेगाने वाढले आहेत. शिवमंदिर येथील स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ९ जागा आहेत. त्यामुळे एका वेळी ९ जणांवर विधी होऊ शकतो. अनेक मृतदेहांना तासन् तास वाट पाहावी लागत आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता सहा मृतदेह होते. त्यापैकी चार वेटिंगवर होते. मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, सकाळी ७ वाजता येऊन नंबर लावला आहे. मात्र, दुपारी १ वाजला तरीही सरण तयार नव्हते. 
अंत्यसंस्कारांसाठी टोकन पद्धत सुरू केली आहे, मात्र त्यात बराच सावळागोंधळ  असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी रात्रीपासून दुपारपर्यंत  आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे सांगितले. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तेथे पालिका प्रशासनाने लक्ष घालावे, अशी अपेक्षा त्रस्त नातेवाइकांनी केली. 

गॅसदाहिन्या बंदच 
पाथर्ली येथील स्मशानभूमीत गॅसदाहिनीची सोय आहे. मात्र ती बंद असल्यामुळे पाथर्ली येथे कोणी गेले नाही. तेथील मृतदेह शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानात आले. त्यामुळे तेथील ताण आणखी वाढला आहे.

महापालिकेचे स्मशानभूमी देखभाल अधिकारी शमीम केदार म्हणाले की, त्या दाहिन्या दुरुस्तीसाठी कुर्ला येथून कारागीर बोलावले आहेत. दोन्ही ठिकाणच्या बेल्टमधील बेअरिंग खराब झाल्यात. त्या बेल्टवर मृतदेहांवरील पीपीई किटचे प्लास्टिक अडकते. आगीत ते जास्त वितळते, त्यामुळे बेल्ट पुढे जात नाही. या तांत्रिक समस्येमुळे दाहिन्या बंद आहेत़ त्या लवकरच सुरू हाेतील.

शिवमंदिर स्मशानभूमीत लाकडावर अंत्यसंस्कार करण्यासाठी २,५०० रुपयांची पावती फाडायची, डिझेलसाठी ५०० रुपये, ३०० रुपये शेणाच्या गाेवऱ्या, अन्य सामग्री व लाकडे रचण्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना काही रक्कम द्यावी असल्याचा आराेप हाेताे. 

Web Title: Bodies for hours waiting for cremation in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.