कल्याण : कौटुंबिक वादातून एक विवाहित महिला तिच्या तीन मुलांसह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. याबाबतची माहिती भाजप कल्याण शहर जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी आणि कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने हा वाद मिटवण्यात यश मिळवले.कल्याण पश्चिमेत राहणारी एक महिला दोन मुली आणि मुलासह १८ दिवसांपासून घराबाहेर राहत आहे. तिने तिचे सामान घराबाहेर दारात मांडून ठेवले आहे. ‘आपला पती दुसरे लग्न करण्याच्या तयारीत असून, त्याने तिला व मुलांना घराबाहेर काढले आहे,’ असा तिचा आरोप आहे. परंतु, मला पतीसोबत राहायचे आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचे तिने सांगितले. दरम्यान, या महिलेची माहिती भाजप नेते किरीट सोमय्यांना मिळताच त्यांच्या सूचनेनुसार भाजपच्या महिला पदाधिकारी चौधरी आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिच्या मदतीला धावल्या. महिला, तिचे सासरे आणि पोलीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर ती सासरच्यांसाेबत राहणार असल्याचे ठरले आहे, असे चौधरी म्हणाल्या.
‘आमच्या जीवाला धाेका’महिलेच्या सासऱ्यांनी सांगितले की, ‘माझी सून मला, सासूला व तिच्या पतीला जाणीवपूर्वक त्रास देते. आम्हाला मारते. त्यामुळे आमच्या जीवाला तिच्यापासून धोका आहे. म्हणून आम्ही तिला भाड्याचे घर घेऊन दिले आहे. मात्र, तिथे तिला राहायचे नाही.’