१०८ नंबरची रुग्णवाहिका आली साडेपाच तासानंतर; रूग्णाला करावी लागली उल्हासनगरात प्रतीक्षा
By सदानंद नाईक | Updated: July 16, 2025 08:04 IST2025-07-16T08:03:46+5:302025-07-16T08:04:16+5:30
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात मुरबाड परिसरातील मोनिका भोईर या महिलेला उपचारासाठी रविवारी रात्री दाखल करण्यात आले होते.

१०८ नंबरची रुग्णवाहिका आली साडेपाच तासानंतर; रूग्णाला करावी लागली उल्हासनगरात प्रतीक्षा
- सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील मेंदूला गंभीर इजा झालेल्या एका महिला रुग्णाला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यासाठी बोलावलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका तब्बल साडेपाच तासांनंतर आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर टीका होत आहे. यापूर्वी याच कारणामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांसह अनेकांच्या बदल्या होऊन निलंबनाची कारवाई झाली होती. त्यानंतरही या अनास्थेबाबत परिस्थिती अजूनही जैसे थे असल्याचे समोर आले आहे.
उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात मुरबाड परिसरातील मोनिका भोईर या महिलेला उपचारासाठी रविवारी रात्री दाखल करण्यात आले होते. घरात पडून त्यांच्या मेंदूला इजा झाल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी केईएम रुग्णालयाला नेण्याच्या सूचना केल्या. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने, नातलगांनी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका दुपारी १२ वाजता फोन करून बोलाविली. मात्र ही रुग्णवाहिका साडेपाच तासांनी आली.
कारवाई का करत नाही?
रुग्णाच्या जीविताशी खेळणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेच्या ठेकेदारावर राज्य सरकार कारवाई का करीत नाही. मुळात शासन, अधिकारी व ठेकेदार यांच्यात आर्थिक हितसंबंध असल्याने, अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांनी केला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनीही १०८ क्रमांकाच्या रुग्णावाहिका सेवेबाबत नाराजी व्यक्त केली.