अंबरनाथच्या झटक्यानंतर भाजपसह महायुतीचा शिंदेसेनेने धरला आग्रह; पदाधिकाऱ्यांना दिले आदेश; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
By सदानंद नाईक | Updated: December 23, 2025 10:20 IST2025-12-23T10:20:36+5:302025-12-23T10:20:56+5:30
भाजपसह महायुती करून उल्हासनगरात भगवा फडकवा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना दिले.

अंबरनाथच्या झटक्यानंतर भाजपसह महायुतीचा शिंदेसेनेने धरला आग्रह; पदाधिकाऱ्यांना दिले आदेश; भाजपच्या भूमिकेकडे लक्ष
- सदानंद नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शेजारील अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद गमवावे लागल्यानंतर उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजपसह सर्व पक्षांची महायुती करण्याचा आग्रह शिंदेसेनेने धरला आहे. येणाऱ्या पालिका निवडणुकीत केवळ युती करून चालणार नाही, तर भाजपसह महायुती करून उल्हासनगरात भगवा फडकवा, असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक नेत्यांना दिले. रिजन्सी मैदानात आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आपण सर्व एकत्र आलो तर महाविकास आघाडीचा भोपळा फुटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.
मेळाव्याला खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, पक्षनेते चंद्रकांत बोडारे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, उल्हासनगरच्या विकासासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. नगरपालिका निवडणुकीत जनतेने कोणती शिवसेना असली व नकली आहे, हे दाखवून दिले.
महायुतीचे समीकरण आणि स्थानिक पेच
उल्हासनगरात शिंदेसेनेने ओमी कलानी टीम आणि स्थानिक साई पक्षासोबत जवळीक साधली. मागील वेळी कलानी व साई पक्षाच्या मदतीने महापौर बसवणाऱ्या भाजपला शह देण्याकरिता शिंदेसेनेने यावेळी त्या दोन्ही पक्षांसोबत युती केली. मात्र, त्यानंतर युतीबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली. युतीमध्ये शिंदेसेनेने आपल्या वाटणीच्या जागांतून ओमी कलानी व साई पक्षाला जागा सोडण्याची मागणी भाजपने केली. शेजारील अंबरनाथमध्ये निवडणुकीत नगराध्यक्षपद गमावल्यावर आता शिंदेसेनेने भाजपसह महायुतीचा आग्रह धरला.
भाजपचा ओमी कलानींना विरोध, युतीसाठी अट
शिंदेसेनेने ओमी कलानी यांच्यासोबत असलेली युती तोडली किंवा कलानी यांची माजी नगरसेवकांची टीम शिंदेसेनेत विलीन झाली तरच त्या पक्षासोबत युती करू, अशी अट भाजपने घातली आहे.