"माझी केस संपवा, मला मोकळे करा" , आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली! कल्याण न्यायालयातील धक्कादायक घटना
By मुरलीधर भवार | Updated: December 21, 2024 19:52 IST2024-12-21T19:48:55+5:302024-12-21T19:52:06+5:30
या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरीता वकिलांनीही गर्दी केली होती.

"माझी केस संपवा, मला मोकळे करा" , आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली! कल्याण न्यायालयातील धक्कादायक घटना
कल्याण - कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. कल्याण पश्चिमेतील अजमेरा या हाय प्रोफाईल सोसायटीत एका मराठी तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ला प्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला याच्यासह ६ जणांना कल्याण जिल्हा सत्र हजर केले जाणार होते. हा हल्ला मराठी विरुद्ध हिंदी या भाषिक वादातून झाला असल्याने आरोपीला न्यायालयात हजर केले जात असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलिसांनी न्यायालयात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
या ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती. त्याचबरोबर या खटल्याची सुनावणी ऐकण्याकरीता वकिलांनीही गर्दी केली होती. हा सगळा प्रकार सुरु असताना दुसरीकडे एका न्यायाधीशांच्या न्याय दालनात आरोपी किरण भरम याने न्यायधीशांच्या दिशेने चप्पल भिरकावली. आरोपी भरम हा गेल्या चार वर्षापासून आधारवाडी कारागृहात न्यायिक बंदी आहे. त्याच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येच्या प्रकरणात आरोप आहे. पोलिसांनी त्याला चार वर्षापूर्वी या प्रकरणात अटक केली. त्याची रवानगी न्यायालायने न्यायालयीन कोठडीत केली. तेव्हापासून तो आधारवाडी कारागृहात आहे. त्याला जामीन मिळालेला नाही.
आरोपी भरम याच्या प्रकरणाची आज न्यायालयीन तारीख होती. या तारखेच्या सुनावणीकरीता पोलिसांनी त्याला आरोपी भरम याला न्यायालयात हजर केले. त्यांच्या प्रकरणावर सुनावणी होऊन त्याला पुढील तारीख दिली गेली. न्यायधीशांनी आरोपी भरम याला घेऊन जाण्यास पोलिसांना सांगितले. त्याचवेळी आरोपी भरम हा जोरात बोलला की, माझी केस संपवा. मला मोकळे करा. हे त्याचे बोलून होत नाही. तोच त्याने त्याच्या पायातील चप्पल काढून न्यायधीशांच्या दिशेने भिरकावली. हा प्रकार पाहून उपस्थित पोलिस आणि वकिल यांना मोठा धक्का बसला. या घटनेची नोंद सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नव्हती.