कल्याण लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला या दोन्ही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले होते. दरम्यान, आरोपीने या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
यावेळी तपास अधिकारी यांनी कोर्टासमोर महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोपी विशाल गवळी याने त्याचा मोबाईल फोन बुलढाणा येथील एका लॉज मॅनेजरला पाच हजार रुपये मध्ये विकला असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे.
मिळालेली माहिती अशी, ज्या बॅगेत मृतदेह बापगाव परिसरात टाकला होता, ती बॅग अजूनही सापडलेली नाही. पोलिसांनी तीन दिवस पोलीस कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने दोन्ही आरोपींचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
दरम्यान, आरोपीला ९ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती, सर्व दस्तावेज मिळाले आहेत, त्यामुळे आरोपीला न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद आरोपी विशाल गवळीचे वकील संजय धनके यांनी केला. आज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी विशाल गवळीला कोर्टातच रडू कोसळले. यावेळी विशाल गवळीने पोलिसांकडे मला एकदा पत्नीला भेटू द्या अशी विनंती केली.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण येथून एक १३ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. आरोपीच्या घराबाहेर पडलेल्या रक्ताच्या डागांवरून त्याने मुलीची हत्या केल्याचे उघड झाले आहे.मंगळवारी भिवंडी नजीकच्या बापगाव परिसरात एका लहान मुलीचा मृतदेह आढळला. चौकशीत तो कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या मुलीचाच असल्याचे समोर आले.
दरम्यान मुलीच्या घराच्या परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता एका ठिकाणी मुलगी जाताना दिसली पण पुन्हा येताना दिसली नाही. त्याठिकाणी तपास केला असता एका घराच्या परिसरात रक्ताचे डाग पडलेले असल्याने तेथे राहणा-या आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विशाल गवळीवर पोलिसांचा संशय बळावला.
पोलिसांनी त्याची पत्नी साक्षीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने विशालने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तीची हत्या केल्याची कबुली दिली. सोमवारी संध्याकाळी पाच वाजता रहात्या घरी विशालने त्या मुलीसोबत गैरकृत्य करून तीची हत्या केली. तिचा मृतदेह मोठया बॅगेत लपविला. सात वाजता बँकेत काम करणारी त्याची पत्नी साक्षी घरी आली असता तिला घडलेला प्रकार विशालने सांगितला.