लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत युती करण्याबाबत ठाण्यात भाजप व शिंदेसेनेचे नेते चर्चा करीत असताना मात्र दोन्ही पक्षांत तणातणी सुरू आहे. अशात कल्याणमधील मेळाव्यात भाजप-शिंदेसेनेत वाक् युद्ध रंगले होते.
कल्याण पूर्वेत भाजपच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेने २०१९ व २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिला व त्याला रसद पुरवली, असा आरोप भाजप नेते जगन्नाथ पाटील यांनी मंगळवारी केला.
तर एकनाथ शिंदे यांनी मागील निवडणुकीत आपल्याला उभे केले असते तर आपल्याला ५४ हजार नव्हे एक लाख १० हजार मते मिळाली असती व आपणच आमदार झालो असतो, असे प्रत्युत्तर शिंदेसेनेचे कल्याण पूर्वेतील महेश गायकवाड यांनी बुधवारी दिले. स्वबळावर लढण्याचा आग्रह दोघांनी धरला. कल्याण पूर्वेत मेळावा झाला.
युती करायची आणि पाठीत खंजीर खुपसायचा हे शिवसेनेने यापूर्वी केले. २०१९ मध्ये कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे अपक्ष उभे होते. त्यांना सगळी मदत त्या वेळी शिवसेनेने केली. २०२४ मध्ये सुलभा गायकवाड यांच्या विरोधात महेश गायकवाड यांना उभे केले. त्यांना ५४ हजार मते कुठून मिळाली? चार महिन्यांनी शिंदेसेनेने महेश गायकवाड यांना पुन्हा पक्षात घेतले. युतीत असे चालत नाही. आम्ही कुठे तरी चुकलो असू; पण आम्ही पाठीत खंजीर खुपसला नाही. भाजपने सगळ्या ठिकाणी उमेदवार उभे केले पाहिजेत. ही ताकद उभी राहिली तर कुणाच्या बापाची आपला पराभव करायची हिंमत नाही, हे कायम लक्षात ठेवावे.- जगन्नाथ पाटील, भाजप नेते
खरी युती बाळासाहेब ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांची होती. काही लाेकांनी विचार बदलले. खा. श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची विरोधी पक्षाच्या उमेदवारासोबत गळाभेट सुरू होती. वेळोवेळी आमच्या नेत्यांचा अपमान करणे. नीच दर्जाची वागणूक देणे हे यांच्याकडून सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीला उभे केले केले असते तर मला एक लाख १० हजार मते पडली असती. आज कल्याण पूर्वेचा मी आमदार असतो. भाजपचा एक नगरसेवक निवडून येताना नाकी नऊ येत हाेते. युतीमुळे निवडून भाजपचे नगरसेवक निवडून येत होते. आमची ताकद दाखविण्याची वेळ आणू नये अशा वल्गना पाटील यांनी करू नये. स्वबळावर एकदा होऊनच जाऊ द्या. - महेश गायकवाड, संपर्कप्रमुख शिंदेसेना
Web Summary : Amid alliance talks for Kalyan-Dombivli elections, BJP and Shinde Sena leaders clashed. Accusations flew regarding past election support and betrayal. Both parties emphasized individual strength and hinted at contesting independently, escalating tensions in Kalyan East.
Web Summary : कल्याण-डोंबिवली चुनावों के लिए गठबंधन वार्ता के बीच, भाजपा और शिंदे सेना के नेता भिड़े। पिछले चुनाव समर्थन और विश्वासघात के आरोप लगे। दोनों दलों ने व्यक्तिगत ताकत पर जोर दिया और स्वतंत्र रूप से चुनाव लड़ने का संकेत दिया, जिससे कल्याण पूर्व में तनाव बढ़ गया।