बिर्ला महाविद्यालयात भरलंय अनोखे गुलाब प्रदर्शन
By सचिन सागरे | Updated: January 24, 2023 17:37 IST2023-01-24T17:34:38+5:302023-01-24T17:37:14+5:30
गुलाब प्रदर्शनासोबतच निवडुंगाच्या वेगवेगळया प्रजाती आणि बॉन्साय प्रकारातील अनेक झाडही मांडण्यात आली आहेत.

बिर्ला महाविद्यालयात भरलंय अनोखे गुलाब प्रदर्शन
कल्याण : सेंच्युरी रेयॉन प्रस्तुत आणि कल्याण रोझ क्लबसह बिर्ला महाविद्यालय, मुंबई रोझ सोसायटी आणि इनरव्हील क्लबच्या माध्यमातून बिर्ला महाविद्यालमध्ये अनोख्या ‘रोझ शो’चे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये वेगवेगळया रंगांचे, आकाराचे आणि सुमारे अडीचशे प्रकारचे दोन हजार गुलाब पुष्प प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस हे गुलाब पुष्प प्रदर्शन सुरू राहणार असून यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.
बिर्ला महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये आयोजित या रोझ शोचे उद्घाटन कल्याण रोझ क्लबच्या अध्यक्षा संतोष चितलांगे यांच्या प्रमूख उपस्थितीत मंगळवारी करण्यात आले. यावेळी बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, इंडीयन रोझ असोसिएशनचे सहसचिव डॉ. विकास म्हैसकर, इनर व्हील क्लब कल्याणच्या माजी अध्यक्षा मेघना म्हैसकर, बिर्ला महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ. अविनाश पाटील, केडीएमसी सचिव संजय जाधव, सीए संघटनेचे कल्याण युनिटचे अध्यक्ष कौशिक गडा आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनात पुणे, नाशिक , कल्याण येथील वेगवेगळया प्रकारचे गुलाब मांडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुवासिक आणि सुवास नसलेल्या अशा गुलाब पुष्पांचाही समावेश आहे. या गुलाब प्रदर्शनासोबतच निवडुंगाच्या वेगवेगळया प्रजाती आणि बॉन्साय प्रकारातील अनेक झाडही मांडण्यात आली आहेत.
सिमेंट काँक्रिटच्या जंगलामुळे मुलं-पालकांना गुलाबाची झाडं लावायला जागाही मिळत नाही. त्यांची माहितीही मिळत नाही. ही माहिती होण्यासह वेगवेगळया प्रकारचे गुलाब पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया कल्याण रोझ क्लबच्या अध्यक्षा संतोष चितलांगे यांनी यावेळी दिली.