उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले
By सदानंद नाईक | Updated: October 27, 2023 15:15 IST2023-10-27T15:04:37+5:302023-10-27T15:15:27+5:30
उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजेन्सी प्लाजा संकुलात शंकर रोशनलाल कुंडला यांचे अंजली फुटवेअर नावाचे दुकान आहे

उल्हासनगरात दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला पकडले
उल्हासनगर : कॅम्प नं-३, शांतीनगरात रिजेन्सी प्लाजा कॉम्प्लेक्स येथील दुकानातून बॅग पळविणाऱ्या चोराला दुकानदाराने पाठलाग करून पकडून पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-३, शांतीनगर येथील रिजेन्सी प्लाजा संकुलात शंकर रोशनलाल कुंडला यांचे अंजली फुटवेअर नावाचे दुकान आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता कुंडला यांनी दुकान उघडण्यासाठी हातातील पिशवी एका खोक्यावर ठेवून कुलूप उघडत होते. त्यावेळी एका चोराने खोक्यावर ठेवलेली पिशवी उचलून पळ काढला. पिशवीत १५ हजार रुपये रोख व जेवणाचा डब्बा होता. पिशवी पळविणाऱ्या चोरट्याचा कुंडला यांनी पाठलाग करून पकडले. त्यांच्या मदतीला स्थानिक नागरिक धावून आल्याने, चोरट्याला पकडून मध्यवर्ती पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी स्थानिक नागरिकांनी चोराला चोप दिला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.