समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यासठी भाजप शिंदे गटाची खेळी; मनसे आमदार राजू पाटील यांनी काढला चिमटा
By मुरलीधर भवार | Updated: June 12, 2023 15:45 IST2023-06-12T15:44:47+5:302023-06-12T15:45:16+5:30
नागरीकांच्या समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यातासाठी भाजप-शिंदे गटाची ही खेळी आहे.

समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यासठी भाजप शिंदे गटाची खेळी; मनसे आमदार राजू पाटील यांनी काढला चिमटा
कल्याण-नागरीकांच्या समस्यांपासून लक्ष विचलीत करण्यातासाठी भाजप-शिंदे गटाची ही खेळी आहे. युती शंभर टक्के होणार आहे. कल्याण लोकसभेत शिवसेनेचाच उमेदवार राहणार आहे. ही मंडळी पुन्हा एकत्रित काम करणार असा चिमटा कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी काढला आहे.
डोंबिवलीतील सावित्रीबाई फुल नाट्यमंदिरात मनसे पदाधिकाऱ््यांचे प्रशिक्षण शिबीर आज आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराला आमदार पाटील हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपरोक्त विधान केले.
मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात शिंदे गटातील पाच मंत्र्यांची गच्छंती होणार आहे. त्यासाठी शिंदे यांच्यावरभाजपचा दबाव आहे. ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या विषयी मनसे आमदार पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी भाजपसह शिंदे गटाला टोला लगावला आहे. काही दिवसापूर्वी आलेल्या सर्व राजकीय सर्व्हेक्षणात शिंदे गटाला कमी स्थान दिले आहे. जनसामान्यांचे लक्ष दुसरीकडे वळविण्याकरीता चाललेली ही राजकीय खेळी आहे. २०१५ साली कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप भांडत होते. त्यानंतर पुन्हा युती केली. ही मंडळी एकाच थाळीचे चट्टेबट्टे आहेत.
एका पाेलिस अधिकाऱ््यावरुन एवढे राजकारण करण्याची गरज नाही. गृह खाते भाजपकडे आहे. अधिकाऱ््याची बदली करायची झाल्यास ते करु शकतात. मात्र त्यावरुन सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने मंजूर करणे, त्यानंतर खासदार शिंदे यांनी राजीनामा देण्यास तयार असल्याचे सांगणे हा सगळा प्रकार नागरीकांच्या समस्यापासून लक्ष विचलित करण्याचा आहे. ते निवडणूकीत शंभर टक्के युती करणार. कल्याण लोकसभेतून शिवसेनेचा खासदार निवडणूक लढविणार हे पक्के आहे. शिवसेनेच्या खासदाराचा निवडणूकीत प्रचार भाजप करणार असे आमदार पाटील यांनी सांगितले.
आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज दुर्दैवी आहे. वारकऱ्यांच्या संपूर्ण इतिहासात ही घटना अत्यंत दुःखद आहे. गृह मंत्रालयाने याची दखल घेतली पाहिजे . पोलीस पोलिसांचं काम करतात हे मान्य मात्र वारकरी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करत असतात. पोलीस जास्त अमानुषपणे वागले हे निषेध करण्यासारखीच गोष्ट असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.