पंकज पाटील, अंबरनाथ: नगरपालिकेवर ठेकेदारांचा वरदहस्त असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ठेकेदारांच्या दोन गटांमध्ये पालिका कार्यालयातच जबर मारहाण सुरू झाली. ही फ्री स्टाईल हाणामारी चक्क पोलिसांच्या समोरच सुरू होती.
अंबरनाथ नगरपालिकेत लहान मोठी कामे करणारा ठेकेदार बॉस्को सुसाईनाथ आणि व्यंकटेश पिचिकरन या दोन ठेकेदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र आज पालिका कार्यालयात फेरीवाल्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच आणि पालिकेत चौक पोलीस बंदोबस्त असतानाच या दोन ठेकेदारांच्या गटांमध्ये फ्री-स्टाइल हाणामारी सुरू झाली.
या हाणामारीत व्यंकटेश या ठेकेदाराच्या समर्थकांनी बॉस्को याला जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ही फ्री स्टाईल हाणामारी सुरू असताना लागलीच पोलिसांनी आणि अंबरनाथ पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी या सर्वांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस हस्तक्षेप करीत असताना देखील दोन्ही गट एकमेकांवर अंगावर धावून जात होते. या हाणामारीनंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या गुंडांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात कारवाईसाठी आणले आहे.