OLA कारचालकाला लुबाडणारे त्रिकुट गजाआड; रोकड, मोबाईल फोनसह कारही होती चोरली

By प्रशांत माने | Updated: January 29, 2024 19:06 IST2024-01-29T19:05:47+5:302024-01-29T19:06:33+5:30

कारमध्ये वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने बसले आणि शाव यांना चाकूचा धाक दाखवित मारहाण केली

3 Accused Arrested, robbing OLA driver; Car was also stolen along with cash, mobile phone | OLA कारचालकाला लुबाडणारे त्रिकुट गजाआड; रोकड, मोबाईल फोनसह कारही होती चोरली

OLA कारचालकाला लुबाडणारे त्रिकुट गजाआड; रोकड, मोबाईल फोनसह कारही होती चोरली

डोंबिवली: ओला कारचालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड, मोबाईल फोन आणि त्याची कार चोरणा-या त्रिकुटाला मानपाडा पोलिसांनी बदलापुर काटई रोडवरील खोणी पलावा फाटा येथे सापळा लावून अटक केली. तिघांकडून चोरी केलेली कार आणि गुन्हयात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे.

शफीक अबुबकर खान (वय २४), अमन तौकीर अहमद अन्सारी ( वय २३), आमन शौकत जमादार (वय २३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. हे सर्व खोणी पलावा, पलावा फेज २ याच परिसरातील राहणारे आहेत. ओला कारचालक सचिन शाव राहणार मुंबई, धारावी हे ३० डिसेंबरला कार घेऊन बदलापूर काटई रोडने जात होते. त्यावेळी तिघांनी शाव यांची कार थांबविली. कारमध्ये वाशी येथे जाण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने बसले आणि शाव यांना चाकूचा धाक दाखवित मारहाण केली आणि त्यांच्याकडील मोबाईल. एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, १५०० रूपयांची रोकड काढून घेतली आणि साव यांना कारबाहेर काढून चोरी केलेल्या मुद्देमालासह कार देखील पळवून नेली होती.

दरम्यान या जबरी चोरीच्या गुन्हयाच्या तपासकामी सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलिस निरिक्षक (गुन्हे) राम चोपडे, पोलिस निरिक्षक दत्तात्रय गुंड, सहाय्यक पोलिस निरिक्षक संपत फडोळ, प्रशांत आंधळे, महेश राळभात, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भानुदास काटकर यांंची पथके नेमण्यात आली होती. आरोपींमधील आमन आणि अमन हे दोघेही सराईत चोरटे आहेत. यातील आमनविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तर अमन याच्यावर मुंबईतील बी.के.सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

Web Title: 3 Accused Arrested, robbing OLA driver; Car was also stolen along with cash, mobile phone