धावत्या लोकलमध्ये प्रवाशाकडे सापडल्या देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या
By मुरलीधर भवार | Updated: April 19, 2024 23:02 IST2024-04-19T23:02:30+5:302024-04-19T23:02:48+5:30
नथूराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाकडे सापडल्या देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या
लोकसभा निवडणूकीला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान धावत्या लोकलमध्ये एका प्रवाशाकडून मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. नथूराम तांबोळी नावाच्या व्यक्तीला कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी वस्तूंची किंवा संदिग्ध व्यक्तिंची तपासणी केली जात आहे. स्टेशन परिसरात, लोकलमध्ये फिरणाऱ््या प्रवाश करणाऱ्यांची तपासणी सुरु आहे. सीएसटी टिटवाळा लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी पोलिस पेट्रोलिंग करीत असताना शहाड आणि टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान एक प्रवासी प्रवास करीत होता. त्याच्या हातात एक बॅग होती.
पोलिसाना पाहून तो घाबरला. घाबरुन संशयास्पद हालचाली सुरु केल्या. हे पाहून पोलिसांना संशय आला. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी त्या प्रवाशाला टिटवाळा स्टेशनवर ताब्यात घेतले. त्याला पोलिस केबीनमध्ये नेले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केली. त्या बॅगेत देशी विदेशी दारुच्या २०० बाटल्या मिळून आली. या व्यक्तीने ही दारु शहाड येथील एका व्यक्तीच्या दुकानातून घेतली आहे. नथूराम तांबोळी असे या व्यक्तिचे नाव आहे. तो खडवली येथे राहतो. कल्याण रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ट पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.