समाजसेवेचा वसा घेत १७ सायकलपटुंची अकराशे किलोमीटर सायकलवारी

By सचिन सागरे | Published: December 9, 2023 12:28 PM2023-12-09T12:28:05+5:302023-12-09T12:28:38+5:30

कल्याणातील बाईकपोर्ट संस्थेचे साहीर शेख यांच्या पुढाकाराने सायकलपटू एकत्र आले.

1100 km cycle ride of 17 cyclists taking advantage of social service | समाजसेवेचा वसा घेत १७ सायकलपटुंची अकराशे किलोमीटर सायकलवारी

समाजसेवेचा वसा घेत १७ सायकलपटुंची अकराशे किलोमीटर सायकलवारी

कल्याण : समाजाप्रती असणारी आपली सहवेदना व्यक्त करण्यासाठी १७ सायकलपटू अकराशे किलोमीटरच्या सायकलवारीसाठी आज पहाटे रवाना झाले. कल्याण पाशिमेकडील दुर्गाडी चौकापासून कर्नाटकामधील कूर्ग येथे निघालेल्या या सायकलपटुंना केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी झेंडा दाखवत रवाना केले. या सायकलवारीच्या माध्यमातून जमा झालेला निधी पैशांअभावी उपचार रखडलेल्या, वैद्यकीय सेवा मिळू न शकलेल्या गरजू कुटुंबीयांना दिला जाणार आहे. या सायकल रॅलीमध्ये डॉक्टर, वकील, इंजिनियर, व्यावसायिक आदी विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

कल्याणातील बाईकपोर्ट संस्थेचे साहीर शेख यांच्या पुढाकाराने सायकलपटू एकत्र आले. मग त्यातूनच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या सायकलवारीला प्रारंभ झाला. गेली चार वर्षे हे सर्व सायकलपटू सामाजिक भान ठेवत विविध राज्यातील भागात सायकल रॅली काढत असल्याची माहिती सहभागी सायकलपटू डॉ. रेहनूमा यांनी दिली. या सर्व १७ सायकलपटुंसमोर पुढील सात दिवसांत कल्याण ते कूर्ग हे अकराशे किमी अंतर कापण्याचे आव्हान असणार आहे. त्यामुळे, दररोज साधारणपणे दोनशे किलोमीटरचे अंतर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे साहीर यांनी सांगितले. या सायकलपटुंचा उत्साह वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवलीतील विविध सामाजिक संस्था आणि त्यांचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाच्या सायकलवारीचे हे पाचवे वर्ष असून याआधीही सामाजिक बांधिलकी जपत ही सायकलवारी संपन्न झाली आहे.

Web Title: 1100 km cycle ride of 17 cyclists taking advantage of social service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.