कोरोना व्हायरसने सध्या सगळीकडे हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये तर ४०० पेक्षा जास्त लोकांचा जीव या व्हायरसने घेतलाय. त्यामुळे जगभरातील लोकांच्या मनात या व्हायरसबाबत मोठी भिती बघायला मिळत आहे. अशात कोरोना व्हायरसच्या मदतीने एका महिलेने तिच्यावर होऊ शकणारा लैंगिक अत्याचार हाणून पाडला आहे.
DailyMail ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील असून एका महिलेच्या घरात रात्री एक व्यक्ती शिरली. त्यावेळी महिला घरात एकटीच होती. अशात ती व्यक्ती आपल्यावर बलात्कार करू शकते अशी शंका आल्यावर महिलेने तिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं सांगितलं. तसेच ती वुहानहून आल्याचेही सांगितले. मग काय घरात शिरलेली व्यक्ती तिथून पळून गेली. तो काही रिकाम्या हाताने गेला नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, Xiao नावाची व्यक्ती शुक्रवारी रात्री या महिलेच्या घरात घुसली. झिंगशान या शहरातील ही घटना असून हे शहर कोरोना व्हायरसची सुरूवात झालेल्या वुहान शहराजवळ आहे.
ही व्यक्ती आपल्यावर लैंगिक अत्याचार करणार असा संशय महिलेला आला होता. त्यामुळे महिला जोरात ओरडू लागली की, 'मी नुकतीच वुहानहून आले आहे आणि मला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे'. इतकेच नाही तर महिलेने खोकला झाल्याची आणि सर्दी झाल्याचा अभिनयदेखील केला. जेणेकरून त्या व्यक्तीला खरं वाटेल.
महिलेने कोरोना व्हायरसचं नाव घेताच ती घरात शिरलेली व्यक्ती जरा घाबरली आणि तिच्यापासून दूर गेली. पण त्याने घरातील ३ हजार ८० युआन लंपास केले. त्यानंतर महिलेने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण सगळेकडे लोकांनी मास्क लावल्याने त्याला शोधता आले नाही. अखेर सोमवारी तो पोलिसांकडे आला आणि त्याने गुन्हा कबूल केला.