Job Interview Rejection: हल्लीचे युग हे स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे नोकरीपासून व्यवसायापर्यंत प्रत्येक बाबतीत प्रचंड स्पर्धा असते. नवी नोकरी मिळवणे हा देखील खूपच कठीण भाग असतो. त्यातही नोकरीसाठी घेतली जाणारी मुलाखत कायमच दडपण आणणारी असते. कधीकधी उमेदवार त्यांच्या पात्रतेने नोकरी मिळवतात. पण कधीकधी उमेदवार अशा विचित्र मागण्या करतात की HR देखील चक्रावून जातो. असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मुलाखतीनंतर एका महिला उमेदवाराने कंपनीकडून अशी मागणी केली की, HR ने जराही वेळ न घालवता तिला नोकरी देणं नाकारले. कंपनीच्या सीईओंनी स्वतः याबाबत माहिती दिली.
महिलेची मागणी काय?
नूडल्स ब्रँड असलेल्या 'नॅच्युरली युअर्स'चे CEO आणि संस्थापक विनोद चेंडिल यांनी एक घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केली. त्यांनी लिहिले की, आज मी एका महिला उमेदवाराशी नोकरीबाबत चर्चा केली. आम्ही तिला CV पाहून शॉर्टलिस्ट केले होते. पण तिने एक विचित्र मागणी केली. ती म्हणाली की, आम्ही आधी तिच्या पतीला भेटलो पाहिजे. तो जर नोकरीसाठी हो म्हणाला, तरच ती नोकरी स्वीकारेल आणि कामावर रूजू होईल. म्हणजेच तिचा पती ठरवेल की तिने आमच्यासोबत काम करायचे की नाही. त्यामुळे तिला तात्काळ 'रिजेक्ट' करून टाकले.
CEO काय म्हणाले?
विनोद चेंडिल यांनी या मागणीवर आश्चर्यही व्यक्त केले. त्यांनी पुढे लिहिले की, एका स्वतंत्र महिलेला अशाप्रकारची वागणूक का हवी असेल? याचा अर्थ ती पूर्णपणे तिच्या पतीवर अवलंबून आहे. ती महिला वरिष्ठ पदासाठी मुलाखतीला आली होती. जर ती स्वतःबाबतचा छोटासा निर्णयही घेऊ शकत नसेल, तर ती कंपनीतील महत्त्वाचे आणि जोखमीचे मोठे निर्णय कसे घेईल? त्यांनी त्या महिलेचे वर्णन 'रेड फ्लॅग' असेही केले.
सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सीईओंनी ही मागणी अत्यंत अव्यावसायिक असल्याचे म्हटले आणि स्पष्ट केले की या आणि इतर काही 'अडचणीं'मुळे त्यांनी ती ताबडतोब नाकारली. त्यांनी असेही म्हटले की अशा वर्तनामुळे व्यावसायिकता आणि स्वावलंबनावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्या. काहींनी सीईओच्या निर्णयाचे समर्थन केले आणि वरिष्ठ पदांवर स्वावलंबन आवश्यक असल्याचे म्हटले. त्याच वेळी, काहींनी असे म्हटले की त्यांनी महिलेच्या वैयक्तिक निर्णयाचा आदर केला पाहिजे. पण मुलाखतीत अशी विचित्र मागणी करणे खरोखरच धक्कादायक होते यावर सर्वांचे एकमत होते.