आपली हौसमौज पूर्ण करण्यासाठी आपण काही गोष्टी करतो पण, या गोष्टी नंतर आपल्यालाच महागात पडतात. अशाच एका घटनेत तीन भावंडांचा जीव जाता जाता वाचला.
सायंकाळच्या वेळी हे तिघे निघाले सायकलिंगला. रमत गमत सायकलिंग करत असताना अचानक पाऊस सुरु झाला अन् त्यांनी रस्त्यात एका ठीकाणी थांबा घ्यायचा निर्णय घेतला. ते तिघे थांबले एका हिरव्यागार झाडाच्याखाली. मस्त कुंद वातावरण आणि हिरवगार झाड पाहुन त्यांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी घेण्यासाठी त्यांनी कॅमेरा ऑन केला आणि सेल्फी क्लिक केला. त्याचबरोबर लगेचच झाडावर वीज कोसळली आणि झाडाने पेट घेतली. यामध्ये तिघं भावंड जखमी झाली. त्यांचा जीव वाचला असला तरी ही दुर्घटना त्यांना चांगलीच भोवली असती. राहेल, इसोबेल आणि अँड्रयू जॉब्सन अशी या तीन भावंडांची नावे आहेत. दक्षिण-पश्चिम लंडनमध्ये हॅम्पटन कोर्ट पॅलेसजवळ मोल्सी लॉक येथे ही घटना घडली. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
घटनास्थळापासून जवळच असलेल्या काही व्यक्तींनी त्यांना मदत केली. त्यांना तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं, याठिकाणी उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी सांगितलं, की एका सायकल दुर्घटनेनंतर इसोबेल यांच्या शरीरात बसवण्यात आलेल्या टायटेनियन प्लेटमुळे वीज त्यांच्या शरीरापर्यंत पोहोचू शकते.
या घटनेबाबत बोलताना २३ वर्षीय इसोबेलनं सांगितलं, की ज्यावेळी वीज कोसळली आणि त्याचा फोटो क्लिक झाला तेव्हा संध्याकाळचे सुमारे पाच वाजले होते. आम्हाला पावसात एक फोटो घ्यायचा होता. अचानक मी जमिनीवर कोसळलो आणि जोराच्या आवाजाशिवाय काहीही ऐकू आलं नाही. माझा हात पूर्णपणे सुन्न झाला होता आणि हात हालवताही येत नव्हता.