दिल्लीतील एका तरुणाला टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला जाणं महागात पडलं आहे. ऑनलाईन डेटिंग अॅपद्वारे डेटिंग करणे या तरुणासाठी चांगलेच झटका देणारे ठरले आहे. टिंडरवर ओळख झालेल्या एका मुलीला भेटण्यासाठी तरुण दिल्लीतील एका कॅफेमध्ये गेला होता. मात्र, या कॅफेत गेल्यावर त्याच्या हातात तब्बल ५० हजारांचे मोठे बिल पडले. हे बिल पाहिल्यानंतर तरुणाला धक्काच बसला. आपल्यासोबत घडलेली ही घटना या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट करून सांगितली आहे.
सोशल मीडियावर केलेल्या या पोस्टमध्ये तरुणाने लिहिले की, एका ऑनलाईन डेटिंग साईटवर माझी एका मुलीशी ओळख झाली. काहीच दिवसांत दोघे एकमेकांशी खूप गप्पा मारू लागले. यानंतर त्यांनी एका कॅफेमध्ये भेटण्याचा प्लॅन केला. ठरल्याप्रमाणे दोघे एकमेकांना भेटले. सुरुवातीला सगळे काही छान सुरू होते. मात्र, नंतर अचानक वेटर महागडे पदार्थ आणून पुढ्यात ठेवू लागले. तरुणाला यात गडबड वाटली. त्याने आरोप केला की, कॅफेतील स्टाफने त्याला मेन्यू आणि किंमती नीट दाखवल्या नाहीत. शेवटी जाण्यासाठी निघाल्यावर त्याच्या हातात ५० हजारांचे बिल ठेवण्यात आले.
या तरुणाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, "हा एक मोठा घोटाळा सुरू आहे. असे कॅफेवाले लोक डेटिंग साईट्सच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढतात आणि त्यांच्या हातात मोठे बिल टेकवून त्यांना लुटतात. मी माझी गोष्ट यासाठी शेअर करत आहे, की यापुढे माझ्यासारखे कुणी अशा फसवणुकीला बळी पडू नये."
या पोस्टसोबतच त्याने लोकांना आवाहन केले की, जर तुम्ही एखाद्या मुलीला भेटायला जाणार असाल, आणि ती तुम्हाला अशा अनोळखी, विशेषतः मेट्रोजवळच्या कॅफेमध्ये बोलवत असेल, तर आधीच सावध व्हा. कोणत्याही कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधी त्यांचा ऑनलाईन रिव्ह्यू तपासून घ्या.