जीत बहादूरची भेट, मोदींचा भावनिक स्टंट ?

By Admin | Updated: August 6, 2014 17:36 IST2014-08-06T14:14:33+5:302014-08-06T17:36:06+5:30

जीत बहादूर २०१२ मध्येच त्याच्या कुटुंबाला भेटला असून जीतने फेसबुकवर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटोही टाकले होते असे समोर येत आहे.

Vijay Bahadur's gift, Modi's emotional stunts? | जीत बहादूरची भेट, मोदींचा भावनिक स्टंट ?

जीत बहादूरची भेट, मोदींचा भावनिक स्टंट ?

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ६ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळ दौ-यात जीत बहादूर या तरुणाची त्याच्या कुटुंबाशी १६ वर्षांनी भेट घडवल्याचा दावा करुन सर्वांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला असला तरी मोदींचा हा दावा कितपत खरा होता असा प्रश्न निर्माण झाला आहे. जीत बहादूर २०१२ मध्येच त्याच्या कुटुंबाला भेटला असून जीतने फेसबुकवर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटोही टाकले होते असे समोर येत आहे. त्यामुळे जीत बहादूरची भेट घडवल्याचा मोदींचा हा दावा भावनिक स्टंट होता अशी चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळ दौ-यावर जाताना अहमदाबादमध्ये राहणा-या जीत बहादूर या नेपाळी तरुणालाही सोबत घेऊन गेले होते. जीत हा १६ वर्षांपूर्वी अहमदाबादमधील रस्त्यावर रडताना आढळला होता. भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याने जीतला मोदींकडे नेले. यानंतर मोदींनी जितला शाळेत घातले व त्याचे अंधकारमय आयुष्य प्रकाशमान करुन टाकले. या जीतला नेपाळमध्ये त्याचे आईवडिल कुठे राहतात हे आठवत नव्हते. 
खुद्द मोदींनीही नेपाळ दौ-यावर जाण्यापूर्वी ट्विटरद्वारे जितच्या कुटुंब भेटीची माहिती दिली. 'या दौ-यात जीतही माझ्यासोबत नेपाळला येणार असून १६ वर्षांनी तो त्याच्या आईवडिलांना भेटणार आहे. त्यामुळे हा नेपाळ दौरा माझ्यासाठी भावनिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे' असे मोदींनी म्हटले होते. कठोर शब्दात विरोधकांचा समाचार घेणा-या मोदींचे हळवे मन यातून दिसून येत होते. 
मात्र आता सोशल नेटवर्किंग साईट्वर मोदींचा हा दावा निव्वळ भावनिक स्टंट असल्याचे दिसून येते. जीत बहाद्दूर २०१२ मध्येच त्याच्या कुटुंबाला भेटून आला असून कुटुंबासोबतचे छायाचित्रही त्याने फेसबुकवर अपलोड केले होते. जीतचे हे छायाचित्र सोशल नेटवर्किंग साईट्सवर वेगाने पसरत आहे. त्यामुळे मोदींनी नेपाळ दौ-यापूर्वी जीतचा आधार घेऊन स्टंटबाजीच केली अशी टीकाही होत आहे. 

Web Title: Vijay Bahadur's gift, Modi's emotional stunts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.