तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी कोणता पर्याय वापरता? स्वत:ची बाईक, कार, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असाल तर लोकल ट्रेन बस, रिक्षा आदी. विमान रोजच्या ये-जा करण्यासाठी वापराल का? नाही ना. परंतू , एक भारतीय महिला अशी आहे जी रोज ऑफिसला ये-जा करण्यासाठी विमानाचा वापर करते. घर आणि ऑफिस मॅनेज करण्यासाठी ही महिला ३०० किमी विमानाने ऑफिसला जाते, पुन्हा ३०० किमींचा प्रवास करून घरी येते.
मलेशियाला राहणारी रेचल ही भारतीय आहे. रेचल कौर यांनी सांगितले की ती हा विमान प्रवास फक्त तिच्या दोन लहान मुलांसाठी करते. विमानाने प्रवास केल्याने माझा वेळ वाचतो आणि तो वेळ मी मुलांसोबत घालविण्यासाठी, त्यांचा अभ्यास घेण्यासाठी वापरते. असे केल्याने खूप पैसे खर्च होत असतील असे तुम्हाला वाटत असेल, परंतू तिच्याबाबतीत असे नाहीय. ती विमानाने प्रवास करून वेळही वाचविते आणि पैसेही.
एका युट्यूब चॅनलने या महिलेची पूर्ण दिनचर्या कशी आहे ते दाखविले आहे. ही महिला रोज सकाळी ४ वाजता उठते. क्वालालंपूरला तिला जायचे असते. तिकडे राहण्यापेक्षा तिला विमानाने प्रवास करणे खूप स्वस्त पडत असल्याचा रेचलचा दावा आहे.
सकाळी ५ वाजता ती घरातून विमानतळाकडे जाण्यास निघते. सकाळी ५.५५ वाजता तिचे विमान आहे. ४० मिनिटांच्या विमानप्रवासानंतर ती ७.४५ वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचते. सुरुवातीला ती एकटीच क्वालालंपूरला राहत होती. परंतू तिथे राहणे तिला महाग पडत होते. ती विकेंडला घरी येत होती.
तिच्याबाबतीत हा विमान प्रवासाचा खर्च जास्त नाहीय याचे कारण म्हणजे ती एअर एशिया एअरलाईन्समध्ये काम करते. ती तिकीट तिच्या पैशांतूनच काढते, परंतू ती त्याच कंपनीत काम करत असल्याने तिला भरपूर डिस्काऊंट मिळतो. यामुळे तिला तिकीट खूप स्वस्त मिळते. यामुळे ती दररोज विमानाने ये-जा करू शकते.