दहा वर्षाच्या भारतीय मुलाने मिळविली माध्यमिक पदविका
By Admin | Updated: June 13, 2014 04:03 IST2014-06-13T03:36:26+5:302014-06-13T04:03:25+5:30
अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका दहावर्षीय मुलाने सर्वांना चकित करणारी कामगिरी केली आहे. घरीच अभ्यास करून त्याने माध्यमिक पदविका मिळविली.

दहा वर्षाच्या भारतीय मुलाने मिळविली माध्यमिक पदविका
लॉस एंजल्स : अमेरिकेतील भारतीय वंशाच्या एका दहावर्षीय मुलाने सर्वांना चकित करणारी कामगिरी केली आहे. घरीच अभ्यास करून त्याने माध्यमिक पदविका मिळविली. तनिष्क अब्राहम असे या प्रतिभावान मुलाचे नाव असून तो कमी वयात माध्यमिक पदविका प्राप्त करणारा अमेरिकेतील पहिला विद्यार्थी बनला आहे. सॅक्रामेन्टो, कॅलिफोर्निया येथील रहिवासी तनिष्कला कॅलिफोर्निया अॅटो म्युझियम येथे रविवारी झालेल्या
एका खासगी समारंभात माध्यमिक शालेय पदविका प्रदान करण्यात आली.
गेल्या मार्चमध्ये झालेल्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. पदविकेसाठी आवश्यक ते गुण तनिष्कने प्राप्त केल्याचे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
‘नोकरशाहीच्या अडसरामुळे हे सोपे नव्हते. मात्र, यासाठी मी भरपूर परिश्रम केले आणि अखेर माध्यमिक पदविका मिळाली याचा मला खूपच आनंद झाला आहे,’ असे अब्राहमने एबीसी न्यूजला सांगितले. अब्राहमला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
त्याने सॅटमध्ये (एसएटी) चांगले गुण मिळविले असून तो सातव्या वर्षापासून कम्युनिटी कॉलेजचा अभ्यास करत आहे. पुढील सत्रापर्यंत कम्युनिटी कॉलेज पूर्ण करून तो विद्यापीठात प्रवेश करेल. (वृत्तसंस्था)